बातम्या

अजितदादा अपघात प्रकरणात फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांचा गंभीर आरोप, ऐनवेळी विमानांची अदलाबदली? नेहमी ब्लॅक जेट ऐवजी.. | Ajit pawar Plane Crash

Ajit pawar plane crash: अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर या कथित विमान अपघाताबाबत अनेक उलटसुटल चर्चा अद्याप सुरू आहेत. अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि इतर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु या अपघाताभोवती दिवसेंदिवस संशयाचे वातावरण अधिक गडद होत असून, अपघात की घातपात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शंका व्यक्त केल्यानंतर आता पिंकी माळी यांच्या वडिलांनीही गंभीर आरोप केले आहेत.

शिवकुमार माळी यांचा गौप्यस्फोट

पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी सांगितले की, “रोहित पवार यांनी मांडलेले सादरीकरण मी पाहिले असून, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

ते पुढे म्हणाले, “माझी मुलगी याआधी पाच वेळा दादांसोबत विमानप्रवासात गेली होती. त्यापैकी चार वेळा ब्लॅक जेट वापरण्यात आले होते. मग ऐनवेळी व्हाईट जेटचा वापर का करण्यात आला? विमानाची अदलाबदल का झाली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रवासाचे नियोजन संशयास्पद असल्याचा दावा केला जात आहे.

कंपनीकडून कोणताही संपर्क नाही

शिवकुमार माळी यांनी आणखी एक गंभीर बाब समोर आणली. “अपघातानंतर कंपनीकडून आम्हाला कोणताही फोन किंवा अधिकृत संपर्क करण्यात आला नाही. माझा जावई आधी बारामतीला गेला, त्यानंतर मी पोहोचलो. अन्यथा माझ्या मुलीचा मृतदेह अनोळखी म्हणूनच राहिला असता,” असे त्यांनी सांगितले.

रोहित पवार काय म्हणाले होते?

रोहित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत विमान, पायलट, हवामान, बारामती विमानतळाची धावपट्टी आणि प्रवासाचे नियोजन या सर्व बाबींवर सविस्तर भाष्य केले. “अजितदादांसोबत घातपात झाला का, याचा सखोल तपास झाला पाहिजे. ते राज्यातील मोठे नेते होते. त्यामुळे हा अपघात हलगर्जीपणाने दुर्लक्षित करता येणार नाही,” असा दावा त्यांनी केला होता. तसेच 27 जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेचाही संदर्भ त्यांनी दिला होता.

Show More
Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा