आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पोवारला अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई | Ichalkaranji Crime News

कोल्हापूर | इचलकरंजी (Ichalkaranji Crime News) शहरात उघडकीस आलेल्या ऑनलाईन बेटिंग प्रकरणात आता राजकीय कनेक्शन समोर येऊ लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भाजपचे नगरसेवक गोट्या उर्फ नितेश पोवार यांचे नाव समोर आले असून पोलिसांनी त्यांना रात्री उशिरा अटक केली आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून प्रतिनिधित्व करणारे नितेश पोवार हे राहुल आवाडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अटकेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणात आणखी काही मोठ्या राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींची नावे चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी अनेकांना रडारवर ठेवले असून तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. बेटिंग प्रकरणात थेट एका विद्यमान नगरसेवकाला अटक झाल्यामुळे शहरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
आयपीएलमधील मुंबई विरुद्ध राजस्थान या सामन्यादरम्यान ऑनलाईन बेटिंगचे रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून चप्पलच्या गोदामातून सुरू असलेले बेटिंग रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत मुख्य सूत्रधार म्हणून अमेय बडवे, अभिजीत बडवे, गणेश पाटील, उत्तमसिंग बग्गा, याकूब मुजावर आणि रिषभ पाटील या सहा संशयितांना अटक करण्यात आली होती. सध्या हे सर्वजण पोलिस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी प्रत्येक संशयिताकडून माहिती घेत बेटिंग नेटवर्कची साखळी उलगडण्यावर भर दिला. या चौकशीतून अनेक धागेदोरे समोर आले असून त्यातूनच भाजप नगरसेवक नितेश पोवार यांचे नाव समोर आल्याची माहिती आहे. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी गोपनीय पद्धतीने कारवाई करत पोवार यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली.
नगरसेवकाला अटक झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेक नागरिकांनी पोलिस ठाणे तसेच न्यायालय परिसरात गर्दी केली होती. या प्रकरणाचे नेटवर्क मोठे असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
सध्या पोलिसांकडून मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड, बँक खात्यांची माहिती तसेच आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. ऑनलाईन बेटिंगमधून किती रकमेची उलाढाल झाली, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

