महायुतीचे नेते कमकुवत म्हणूनच मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; सतेज पाटील यांचा टोला | Gokul Election Sattej Patil

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, काँग्रेसचे नेते तथा आमदार सतेज पाटील (Gokul Election Sattej Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या काळात गोकुळ दूध संघावर तब्बल 25 ते 30 वर्षे सत्ता होती, मात्र त्या काळात काँग्रेस सरकारमधील कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी गोकुळच्या कारभारात हस्तक्षेप केला नव्हता. आज मात्र महायुतीचे जिल्ह्यातील नेते कमकुवत पडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः हस्तक्षेप करावा लागत आहे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
यावेळी बोलताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या परंपरेचा उल्लेख केला. पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या तीन ते चार दशकांपासून जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका पक्षविरहित पद्धतीने होत आल्या आहेत. त्यामुळेच या संस्था सक्षमपणे टिकून राहिल्या आणि त्यांचा विकास झाला, असे ते म्हणाले. गोकुळ दूध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांसारख्या संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण आणण्याची परंपरा यापूर्वी कधी नव्हती. आम्ही कधीही पक्षाचे लेबल घेऊन या संस्थांच्या पायरीवर गेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारच्या कार्यकाळातच या संस्थांमध्ये राजकारण शिरले असल्याचा आरोप करत त्यांनी महायुतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर अखेर सर्वांनी एकत्र येऊन युतीच करायची होती, तर मागील तीन महिने गोकुळ दूध संघाची बदनामी का करण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गोकुळ ही साडेपाच लाख शेतकरी दूध उत्पादकांशी संबंधित संस्था आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार सर्वप्रथम व्हायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शेतकऱ्यांना गोकुळमार्फत 14 रुपयांची दरवाढ देण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, महायुतीची राजकीय ताकद काहीही असली तरी गोकुळशी संबंधित शेतकरी आपल्या पाठीशी असल्याचा त्यांना विश्वास आहे.
यावेळी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही भाष्य केले. गोकुळवर प्रशासक नियुक्त होऊ नये यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल 22 वेळा दूरध्वनीवर संपर्क साधल्याचा दावा त्यांनी केला. मात्र मुख्यमंत्री यांनी त्यांचे म्हणणे ऐकले की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासक नियुक्तीबाबत स्वतंत्र प्रस्ताव मांडला होता, परंतु तोही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केला नाही, असा आरोप त्यांनी केला.
गोकुळ दूध संघाची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत आमच्या पॅनेलमध्ये एकूण 25 उमेदवार असतील, अशी घोषणाही आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यामुळे आगामी काळात गोकुळ निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट राजकीय सामना रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

