Hello KolhapurNews

‘माझ्याकडून वाचणार नाहीस’; इंगवले-माने ऑडिओ क्लिपने ठाकरे सेनेत खळबळ… | Shiv Sena UBT Ravikiran Ingavale Manjit Mane

Viral audio clip exposes alleged internal conflict within Shiv Sena (UBT) in Kolhapur.

कोल्हापूर : शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला असून, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि कोल्हापूर शहरप्रमुख मंजित माने (Shiv Sena UBT Ravikiran Ingavale Manjit Mane) यांच्यातील फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या संभाषणात इंगवले यांनी माने यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे पक्षातील गटबाजी आणि पदाधिकाऱ्यांमधील मतभेद उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

माहितीनुसार, रविकिरण इंगवले यांनी मंजित माने यांना फोन करून, “सुनील जोशी यांना तुम्ही इंगवलेंची माणसं असे का म्हणता?” अशी विचारणा केली. त्यावर मंजित माने यांनी आपण तसे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच संबंधित व्यक्तीला कॉन्फरन्स कॉलवर घेऊन चर्चा करण्याची सूचनाही त्यांनी केली. मात्र, त्यावर इंगवले यांनी नाराजी व्यक्त करत, “मी तुझा कामगार नाही,” असे सांगितले.

संभाषण पुढे अधिक तीव्र होत गेले. इंगवले यांनी “तुझ्या दारात पाच मिनिटांत येतो” असे म्हणत थेट आव्हान दिल्याचे ऑडिओमध्ये ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. त्यावर मंजित माने यांनीही, “या, मी बाहेर आहे. दहा मिनिटांत पोहोचतो,” असे प्रत्युत्तर दिले. यानंतर दोघांमधील शाब्दिक संघर्ष आणखी वाढल्याचे समोर आले आहे.

या संभाषणात इंगवले यांनी “तू बालगोपाल, खंडोबा तालमीकडून वाचलाच… माझ्याकडून वाचणार नाहीस,” अशा शब्दांत धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यावर मंजित माने यांनी, “वाचायचा संबंधच नाही,” असे उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली.

ऑडिओ क्लिपमध्ये पुढेही दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून येते. इंगवले यांनी आक्रमक भाषा वापरत, “तुझी आणि माझी भविष्यात कधीतरी भेट होणारच आहे, मला तू पाहिजेच आहेस,” असे म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर माने यांनी, “भेट काय… मी रोज असतोयच की तुमच्या तेथे?” असे प्रतिआव्हान दिले. यानंतर इंगवले यांनी “ये मग… उद्या सकाळी ट्रायल घे माझी,” असे म्हणत पुन्हा आव्हान दिल्याचे ऑडिओमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

या कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील अंतर्गत मतभेद, गटबाजी आणि पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर ही क्लिप मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून, कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावर संबंधित नेत्यांकडून अधिकृत भूमिका काय मांडली जाते, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा