Hello Kolhapur

कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे पूर्ण आगमन; शिरोळमध्ये सर्वाधिक 49.6 मि.मी. पाऊस, आज यलो अलर्ट | Kolhapur Monsoon Alert

Monsoon Covers Entire Kolhapur District; Shirol Records Highest Rainfall of 49.6 mm

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी मान्सूनने (Kolhapur Monsoon Alert) पूर्णपणे हजेरी लावत सर्व भाग व्यापले. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्हाभर वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी वर्गालाही दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी अधिकृतपणे मान्सून संपूर्ण जिल्ह्यात पोहोचल्याची घोषणा केली. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 21.3 मि.मी. पावसाची नोंद झाली असून शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 49.6 मि.मी. पाऊस झाला आहे. कोल्हापूर शहरातही 24 मि.मी. पावसाची नोंद झाली.

मान्सूनची वाटचाल शनिवारी चंदगड तालुक्यापर्यंत झाली होती. त्यानंतर त्याचा वेग काहीसा मंदावला असला तरी रविवारी तो संपूर्ण जिल्ह्यात पोहोचला. रविवारी मध्यरात्रीनंतर अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आणि पहाटेपर्यंत अनेक ठिकाणी संततधार कायम होती. जिल्ह्यातील धरणक्षेत्रांनाही या पावसाचा लाभ झाला असून काही जलस्रोत क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद आहे.

धरण क्षेत्रातील पावसाची आकडेवारी पाहता जांबरे परिसरात सर्वाधिक 62 मि.मी. पाऊस झाला. याशिवाय कोदे आणि घटप्रभा येथे प्रत्येकी 47 मि.मी., कुंभी धरण परिसरात 29 मि.मी., पाटगावमध्ये 18 मि.मी., दूधगंगा क्षेत्रात 12 मि.मी. तर चित्री आणि जंगमहट्टी येथे प्रत्येकी 10 मि.मी. पावसाची नोंद झाली.

सोमवारी मृग नक्षत्राच्या प्रारंभालाही पावसाची साथ लाभली. दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते. काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीही कोसळल्या. सकाळी दहा वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 21.3 मि.मी. पाऊस झाला. यामुळे 1 जूनपासून आजअखेर जिल्ह्यातील एकूण पावसाची नोंद 39.7 मि.मी.वर पोहोचली आहे.

तालुकानिहाय पावसाची नोंद (गेल्या 24 तासांत) : Kolhapur Monsoon Alert

तालुकापाऊस (मि.मी.)
हातकणंगले21.0
शिरोळ49.6
पन्हाळा20.6
शाहूवाडी18.6
राधानगरी7.8
गगनबावडा6.3
करवीर10.2
कागल12.3
गडहिंग्लज36.5
भुदरगड11.7
आजरा24.2
चंदगड21.4

दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मान्सूनच्या या सक्रियतेमुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा