Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

Breaking News: वाल्मिक कराड पुणे सीआयडीच्या ताब्यात | Walmik Karad

पुणे | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला सीआयडी पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अवादा कंपनीच्या २ कोटीच्या खंडणी प्रकरणात सीआयडीच्या एका पथकाने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

तर दुसरीकडे याबाबत ऑफिशअली कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याने या कारवाईबाबत संभ्रमावस्था असल्याचे पहायला मिळत आहे. तर काही वृत्त माध्यमांनी वाल्मिक कराड याच्या सीआयडीने नाड्या आवळल्या असून कराड सरेंडर करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र वाल्मिक कराडला पुणे सीआयडीच्या पथकाने ताब्यात घेतल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा पुढच्या 24 तासात सरेंडर होणार असल्याच्या बातम्या पहायला मिळत होत्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीची 9 पथके तयार करण्यात आली होती.

संतोष देशमुख हत्येप्रकरणी सीआयडीने आरोपींचे मोबाईल डेटा तपासल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड याचेही बँक खाते गोठवण्यात आले आहे.

देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी

फरार आरोपी नंबर 1 – सुदर्शन घुले
फरार आरोपी नंबर 2 – कृष्णा आंधळे
फरार आरोपी नंबर 3 – सुधीर सांगळे

याच तिन्ही फरार आरोपींच्या शोधात बीड पोलिसांसह सीआयडीची पथके जंगजंग पछाडत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता पर्यंत एकूण सात आरोपीं विरोधात केज पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या सात पैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक केलीय.

तसेच या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडच नाव घेतलं जातय. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. असं असलं तरी पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कोणत्या गुन्ह्याखाली ताब्यात घेण्यात आलं आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा