हॅलो कोल्हापूरबातम्या

कोल्हापूर: दानोळीमध्ये तरूण व्यावसायिकाचा अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह | Danoli Youth Kidnapping Case

Kidnap for ransom turns fatal; police response questioned by villagers.

कोल्हापूर | जिल्ह्यातील दानोळी येथे सोमवारी (ता. १३) रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय ४०) यांचे अज्ञातांनी अपहरण करून नंतर खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास भरतेश यांचे अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर त्यांच्या मोबाईलवरूनच चुलत भावाला फोन करून २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी भरतेश यांचा भाऊ महावीर आणि त्यांचे दोन मित्र पोहोचले. मात्र, अपहरणकर्त्यांनी वारंवार ठिकाण बदलण्यास सांगितले आणि काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला. यामुळे परिस्थिती अधिकच संशयास्पद बनली.

घटनेची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांनी अपहरणकर्त्यांच्या फोनचे रेकॉर्डिंगही पोलिसांना ऐकवले. मात्र, पोलिसांनी केवळ बेपत्ता झाल्याची नोंद घेत “उद्या तपास करू” असे सांगितल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांच्या मदतीने स्वतःच शोधमोहीम सुरू केली.

शोधादरम्यान शहरीमळा रस्ता येथील उसाच्या शेतात भरतेश यांची गाडी आणि चप्पल आढळून आली. त्याच ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूटही सापडले. घटनास्थळी झटापट झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने अपहरणानंतर गंभीर प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सकाळी सुमारे अकरा वाजता पोलीस निरीक्षक गोरे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांच्या विलंबित कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. “योग्य वेळी तपास सुरू झाला नाही आणि पुन्हा तीच माहिती मागत आहात,” असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावर पोलीस निरीक्षकांनी “तपास सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल, नागरिकांनी काळजी करू नये,” असे आश्वासन दिले.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोपही करण्यात येत आहे. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवर तत्काळ कारवाई झाली असती तर भरतेश यांचा जीव वाचला असता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच घटनास्थळी राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांपूर्वी पोहोचल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा