Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्याहॅलो कोल्हापूर

धक्कादायक! पोषण आहाराच्या पाकिटात मेलेली बेडकी; गगनबावडा तालुक्यातील प्रकाराने संतापाची लाट | Nutrition Scheme

Dead frog found in government nutrition food packet sparks outrage in Kolhapur.

Nutrition Scheme: गर्भवती माता आणि लहान बालकांच्या पोषणासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गगनबावडा तालुक्यात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील शेणवडे पैकी चौगुलेवाडी येथील अंगणवाडीतून वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या ‘सुकडी’च्या पाकिटात मेलेली बेडकी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत गर्भवती माता तसेच सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना सकस आहार पुरविला जातो. या योजनेत डाळ, तांदूळ, तिखट, मीठ तसेच ‘सुकडी’सारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. अंगणवाड्यांमार्फत हा आहार नियमितपणे लाभार्थ्यांना वितरित केला जातो.

चौगुलेवाडी येथील अंगणवाडीतूनही लाभार्थ्यांना पोषण आहाराचे पाकिटे देण्यात आली होती. मात्र, एका लाभार्थ्याने घरी नेल्यानंतर ‘सुकडी’चे पाकीट उघडले असता त्यामध्ये चक्क एक मेलेली बेडकी आढळून आली. हा प्रकार लक्षात येताच संबंधित कुटुंबाने अंगणवाडी सेविका आणि स्थानिक नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बाब संपूर्ण परिसरात पसरली आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सरकारकडून मातांच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्येच अशा प्रकारे घाण, कीटक किंवा मृत प्राणी आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. अशा निष्काळजीपणामुळे लहान मुलांच्या आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

राज्यात या पोषण आहाराचा पुरवठा एकाच ठेकेदाराकडून केला जातो. त्यामुळे पॅकेजिंगच्या वेळी ही बेडकी पाकिटात गेली कशी? उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आता पालकवर्गातून जोर धरू लागली आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा