Hello KolhapurNews

कोल्हापुरात ७२ हजार जणांचे मोफत रेशन बंद; मिशन सुधारची मोठी कारवाई | Kolhapur Ration Card

Kolhapur district begins large-scale ration card verification, leading to the removal of ineligible beneficiaries from the free food grain scheme.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राज्य शासनाच्या मिशन सुधार योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांची (Kolhapur Ration Card) पडताळणी मोहीम वेगाने सुरू असून या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थ्यांना मोफत धान्य योजनेतून वगळण्याची कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३४ हजार ८३८ रेशन कार्डांवरील सुमारे १ लाख ३७ हजार लाभार्थ्यांचे मोफत धान्य बंद करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यापैकी १८ हजार ४ रेशन कार्डांवरील सुमारे ७२ हजार नागरिकांचे मोफत धान्य शुक्रवारी बंद करण्यात आले आहे. उर्वरित सुमारे ६५ हजार लाभार्थ्यांचे रेशन रविवारपर्यंत बंद होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून मोफत धान्य दिले जाते. मात्र, या योजनांचा लाभ आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या काही व्यक्तींनीही घेतल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे प्रत्यक्ष गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याची बाब शासनाच्या लक्षात आली. यानंतर राज्य शासनाने मिशन सुधार योजना राबवत संपूर्ण राज्यातील रेशन कार्डधारकांची सखोल पडताळणी करण्याचा निर्णय घेतला.

या मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला संशयित आणि पडताळणीसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने संबंधित रेशन कार्डधारकांची माहिती तपासण्यास सुरुवात केली. पडताळणीनंतर अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब योजनेतून वगळून त्यांचे मोफत धान्य बंद करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.

पडताळणीसाठी काही विशिष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये वार्षिक २५ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले उच्च उत्पन्न गटातील नागरिक, वार्षिक ६ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले लाभार्थी तसेच विविध कंपन्या किंवा संस्थांमध्ये संचालक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील आकडेवारीनुसार उच्च उत्पन्न गटातील २९६, जादा उत्पन्न असलेल्या ३० हजार ९७४ आणि कंपनी अथवा संस्थांमध्ये संचालक असलेल्या ३ हजार ५६८ व्यक्तींची नोंद पडताळणीसाठी करण्यात आली होती. यापैकी शुक्रवारअखेर उच्च उत्पन्न गटातील १७३, जादा उत्पन्न असलेल्या १६ हजार ११९ आणि संचालक असलेल्या १ हजार ७१२ व्यक्तींवर कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य शासनाने २ जून रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी सुधारित इष्टांक जाहीर केला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचा अंत्योदय कुटुंब योजनेतील इष्टांक ७५९ ने कमी करण्यात आला असून प्राधान्य कुटुंब योजनेतील इष्टांकात १३ हजार २६६ इतकी घट करण्यात आली आहे. नव्या सुधारित इष्टांकानुसार जिल्ह्यात अंत्योदय योजनेअंतर्गत ५१ हजार ५७८ रेशन कार्डधारकांना, तर एकूण २३ लाख ३० हजार २८९ नागरिकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी गतवर्षी अंत्योदय योजनेतील ५२ हजार ३३७ रेशन कार्डधारक आणि २३ लाख ४३ हजार ५५५ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता.

मिशन सुधार मोहिमेमुळे अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळून प्रत्यक्ष गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत अन्नसुरक्षा योजनांचा लाभ पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा