“11वीची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; विज्ञान- वाणिज्यचा कटऑफ घसरला” | Maharashtra Education Class 11 Admission

कोल्हापूर : अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून यंदा विज्ञान आणि वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेच्या कटऑफमध्ये प्रत्येकी एक टक्क्याने घट (Maharashtra Education Class 11 Admission) झाल्याचे समोर आले आहे. या पहिल्या यादीत सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील 291 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण 70 हजार 690 प्रवेश जागा उपलब्ध असून यावर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या प्रवेश फेरीत जिल्ह्यातील 32 हजार 696 विद्यार्थ्यांचे प्रवेश लॉक झाले आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात 19 हजार 334 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
शाखानिहाय प्रवेशाची आकडेवारी पाहता विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे दिसून येते. विज्ञान शाखेत 11 हजार 666 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. वाणिज्य शाखेत 3 हजार 477 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून कला शाखेत 3 हजार 895 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाखानिहाय प्रवेश : Maharashtra Education Class 11 Admission
| शाखा | निश्चित प्रवेश |
|---|---|
| विज्ञान | 11,666 |
| वाणिज्य | 3,477 |
| कला | 3,895 |
| एकूण | 19,334 |
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे, त्यांनी 3 जूनपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. याच कालावधीत कागदपत्र पडताळणी तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत मिळालेल्या महाविद्यालयातच प्रवेश घेणे अपेक्षित आहे.
ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळालेले नाही, त्यांना दुसऱ्या प्रवेश फेरीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला विद्यार्थ्यांच्या प्रवेश यादी पाठविण्यात आल्या असून त्या संबंधित संस्थांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक 5 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही विद्यार्थ्याला कागदपत्रांच्या अभावामुळे प्रवेश नाकारता येणार नाही. विद्यार्थ्यांकडे मूळ गुणपत्रक उपलब्ध नसले तरी ऑनलाइन प्रिंटच्या आधारे प्रवेश देण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अनावश्यक चिंता न करता वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कला शाखेच्या कटऑफमध्ये यंदा सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कला शाखेचा कटऑफ तीन टक्क्यांनी कमी झाला आहे. डी. डी. शिंदे सरकार कॉलेजचा चालू वर्षातील कटऑफ 87.08 टक्के आहे. तर न्यू कॉलेजचा कटऑफ 80 टक्के असून स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा कटऑफ 78 टक्के आहे.
कोल्हापूर विभागाचा विचार करता, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा या प्रवेश प्रक्रियेत समावेश आहे. विभागातील एकूण प्रवेश क्षमता 2 लाख 2 हजार 980 इतकी आहे. पहिल्या फेरीत 94 हजार 773 विद्यार्थ्यांचे प्रवेश लॉक झाले असून त्यापैकी सुमारे 54 हजार विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रत्यक्ष महाविद्यालये मिळाली आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

