Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Govt-SchemeNews

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक | PM Kisan AgriStack

कोल्हापूर : जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद असलेल्या सुमारे ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ७१ हजार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक ( PM Kisan AgriStack) नोंदणी अद्याप प्रलंबित असून, या सर्व नोंदी येत्या १५ दिवसांत मोहीम स्वरूपात पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, यापुढे कोणत्याही कृषीविषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य राहणार आहे. तसेच शासनाच्या नियोजित कर्जमाफी योजनेचा लाभ मिळविण्यासाठीही पात्र शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ग्रामस्तरावर महा ई-सेवा केंद्र चालक, सरपंच, स्थानिक पदाधिकारी व सोसायटी सचिव यांच्या समन्वयाने ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी विशेष मोहीम राबवून उर्वरित नोंदी पूर्ण कराव्यात. यासाठी प्रत्येक लाभार्थ्याशी संपर्क साधून नोंदणीची सद्यस्थिती तपासावी व आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

लाभार्थी मयत असल्यास वारसा नोंद पूर्ण करून वारसाची ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी. जमीन मालकी नसताना पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने दाखला देण्याची कार्यवाही करावी. तसेच परगावी असलेल्या लाभार्थ्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तातडीने जवळच्या महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधून नोंदणी पूर्ण करावी. कोणतीही अडचण असल्यास ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी मंजूर वनदाव्याच्या आधारे फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी, महसूल, ग्रामविकास आणि सहकार विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अभियान राबवून विहित मुदतीत ॲग्रीस्टॅक नोंदी पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा