पाणी फाउंडेशनतर्फे ‘फार्मर कप’साठी गगनबावड्यातील ४८ शेतकऱ्यांचे निवासी प्रशिक्षण संपन्न | Pani Foundation Farmer Cup
गटशेती, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

गगनबावडा (चंद्रकांत पाटील, प्रतिनिधी) | पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘फार्मर कप २०२६’ च्या पूर्वतयारीसाठी गगनबावडा तालुक्यातील ४८ शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झारप येथे आयोजित निवासी प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला. ‘उमेद’ अभियान आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात शेतकऱ्यांना आधुनिक व गटशेतीचे महत्त्वपूर्ण धडे देण्यात आले. पाणी फाउंडेशन, (Pani Foundation Farmer Cup) उमेद अभियान आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
स्मार्ट शेतीच्या युगात वैयक्तिक शेतीपेक्षा गटशेतीची ताकद कशी मोठी आहे, यावर या शिबिरात विशेष भर देण्यात आला. या प्रशिक्षणादरम्यान सहभागी शेतकऱ्यांना गटशेती यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक नियमावलीची अनेक यशस्वी प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव आणि कार्यपद्धती मांडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. खरीप हंगामात होणाऱ्या फार्मर कपसाठी गावनिहाय निमंत्रकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना निरंतर तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या निवासी शिबिरासाठी केंद्र व्यवस्थापक मनीष पेडणेकर, डॉ. हर्षदा देवधर, कृषी सहाय्यक चौगुले , पाणी फाऊंडेशनचे सुरज कोळसे अभिषेक सुतार, प्रिया घमरे, श्रद्धा खंडाळे, किशोर इंगोले, शिवाजी जोंधळेकर , चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच भगीरथ प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने गगनबावडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
“गटशेतीच्या माध्यमातून शेतीचा खर्च कमी करून उत्पादन वाढवणे शक्य आहे. पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या या पुढाकारामुळे गगनबावडा तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून अधिक सक्षम होतील.”
येणाऱ्या खरीप हंगामात ‘फार्मर कप २०२६’ मध्ये गगनबावडा तालुका आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. कृषी विभाग, उमेद आणि पाणी फाउंडेशन यांच्या समन्वयामुळे या भागातील शेतीला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

