Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

कोतोली येथील बार वर छापा; 2 जणांवर गुन्हा दाखल | Kotoli Crime News

कोल्हापूर | जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोतोली (Kotoli Crime News) येथे बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या देशी दारूवर पन्हाळा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथील परमीट रूम आणि बिअर बारच्या पाठीमागील मोकळ्या जागेत विक्रीच्या उद्देशाने विनापरवाना देशी दारूचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी छापा टाकण्यात आला. या कारवाईत तब्बल १ लाख ९ हजार ७६० रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोतोली गावातील ‘मित्र प्रेम परमीट रूम आणि बिअर बार’च्या पाठीमागील मोकळ्या जागेत उघड्यावर बेकायदेशीररीत्या दारू विक्री सुरू असल्याची माहिती पन्हाळा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन पंडित चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी छापा टाकण्याची योजना आखली.

गुरुवारी दि. २८ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. छाप्यात मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला. हा साठा कोणत्याही प्रकारचा वैध परवाना न घेता विक्रीच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण मुद्देमाल जप्त करून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी रवींद्र बाळू पाटील (वय ४०, रा. नणंद्रे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) आणि अजित विठ्ठल खोत (वय २२, रा. परळी पैकी कासारवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) या दोघांविरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या दारूच्या साठ्याची अधिक तपासणी सुरू केली असून हा साठा नेमका कुठून आणण्यात आला, तो किती दिवसांपासून विक्रीसाठी ठेवण्यात आला होता तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नाईक करत आहेत.

पन्हाळा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या कारवायांमुळे अवैध धंद्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा