NewsHello Kolhapur

गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी सुरू; भाजपला 2 हजार ठराव आणण्याचे लक्ष्य | Kolhapur News Chandrakant Patil

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजप आणि महायुतीकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Kolhapur News Chandrakant Patil) यांनी गोकुळ निवडणुकीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना किमान दोन हजार दूध संस्थांचे ठराव गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. गोकुळमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सांगत, गोकुळवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रेसिडेन्सी क्लब येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत गोकुळ निवडणुकीसाठी ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ची घोषणा करण्यात आली. त्यानंतर रविवारी दुपारी शिरोळ येथे भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत गोकुळ निवडणुकीसंदर्भातील रणनीती, ठराव संकलनाची मोहीम आणि संघटनात्मक तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री पाटील म्हणाले की, गोकुळची निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आघाडीची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. येत्या मंगळवारपासून दूध संस्थांचे ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून महायुतीतील सर्व घटक पक्ष आपापल्या ताकदीने आणि प्रभावाने ठराव गोळा करणार आहेत. अशा परिस्थितीत भाजपकडेही लक्षणीय आणि लक्षवेधी प्रमाणात ठराव असणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान दोन हजार दूध संस्थांचे ठराव भाजपच्या बाजूने कसे मिळतील, यासाठी नियोजनबद्ध काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्याच यशाची पुनरावृत्ती गोकुळ निवडणुकीत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. गोकुळची निवडणूक ही केवळ एका संस्थेची निवडणूक नसून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळे भाजपकडे जास्तीत जास्त ठराव कसे येतील, यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीला माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, संजय घाटगे, आमदार राहुल आवाडे, समरजितसिंह घाटगे, गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक, अंबरिष घाटगे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. प्रत्येक तालुक्यातील दूध संस्थांचे ठराव मोठ्या संख्येने भाजपच्या बाजूने मिळावेत, यासाठी स्थानिक पातळीवर सक्रिय प्रयत्न करावेत. गोकुळ निवडणुकीत यश मिळविण्यासाठी आता ठराव संकलनाच्या मोहिमेला गती देणे आवश्यक असून, सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा