गोकुळ निवडणुकीत महायुती विरुद्ध सतेज पाटील; रंगणार थेट सामना | Kolhapur Politics Gokul Election

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या निवडणुकीची रणधुमाळी आता प्रत्यक्षात सुरू झाली असून, या निवडणुकीत महायुती आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यात थेट सामना रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. मुख्यमंत्री यांच्या आदेशानंतर महायुतीतील सर्व प्रमुख नेते एकत्र आले असून, गोकुळची निवडणूक (Kolhapur Politics Gokul Election) एकजुटीने लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे, आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वीच स्वतंत्र भूमिका घेत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीची घोषणा केली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीसमोर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे तगडे आव्हान उभे राहणार आहे.
गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला असून, मंगळवार दि. २ जूनपासून ठराव गोळा करण्यास सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी मागील काही वर्षांतील मतभेद आणि वाद बाजूला ठेवून निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुतीने गोकुळच्या निवडणुकीसाठी एकसंध शक्ती उभी केल्याचे चित्र दिसत आहे.
दुसरीकडे, आमदार सतेज पाटील यांनी महायुतीविरोधात स्वतंत्र लढाईची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या आघाडीसोबत जे घटक येतील त्यांना सोबत घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची त्यांची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला गोकुळची निवडणूक ही महायुती विरुद्ध सतेज पाटील अशीच रंगण्याची शक्यता अधिक आहे.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला यश मिळाले होते. मात्र त्या निवडणुकांमध्येही आमदार सतेज पाटील यांनी महायुतीला कडवी झुंज दिली होती. गोकुळच्या निवडणुकीतही त्याच प्रकारचे चित्र पाहायला मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तथापि, सहकार क्षेत्रातील निवडणुकांचे राजकारण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपेक्षा वेगळे असते. त्यामुळे महायुती एकहाती विजय मिळवते की सतेज पाटील पुन्हा एकदा प्रभावी आव्हान उभे करतात, हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यानच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीदेखील काही स्तरांवर हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. निवडणूक लागल्यास सर्वच गटांसाठी ती खर्चिक ठरणार असल्याने बिनविरोध पर्यायावर काही नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही एका प्रमुख नेत्याने आमदार सतेज पाटील यांना बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव दिला होता. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक लांबणीवर पडली आणि त्यासोबतच तो प्रस्तावही पुढे सरकू शकला नाही.
आता पुन्हा एकदा बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अशा कोणत्याही प्रस्तावाला आमदार सतेज पाटील काय प्रतिसाद देतात, यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील. त्यामुळे गोकुळची निवडणूक प्रत्यक्ष मतदानाद्वारे होणार की बिनविरोध मार्गाने निकाल लागणार, याकडे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

