NewsHello Kolhapur

बैठकीचे निमंत्रणच नाही! बैठकीत डावलल्याने शिवसेना नेते संतप्त | Kolhapur Politics Shiv Sena

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील नेत्यांमध्ये सुरू असलेली धुसफूस वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर थांबल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या (Kolhapur Politics Shiv Sena) काही प्रमुख नेत्यांना आणि आमदारांना निमंत्रण न दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, विनय कोरे तसेच समित कदम उपस्थित होते. बैठकीदरम्यान गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीच्या पॅनलचे नाव जाहीर करण्यात आले आणि निवडणुकीची पुढील रणनीतीही निश्चित करण्यात आली.

मात्र या बैठकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि गोकुळमधील प्रभावी नेते मानले जाणारे आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. गोकुळ निवडणुकीत या दोन्ही नेत्यांकडे निर्णायक मते असल्याचे मानले जाते. तसेच ते महायुतीच्या गोकुळमधील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.

बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने आमदार चंद्रदीप नरके यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे उघडपणे नाराजी व्यक्त केली. या नाराजीची दखल घेत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी तत्काळ परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुरू केला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत नाराजी दूर करण्यासाठी विविध स्तरावर चर्चा सुरू होती. अखेर रात्री सुमारे अकराच्या सुमारास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिवाजी पेठ येथील आमदार चंद्रदीप नरके यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

रविवारी दिवसभरही नाराज नेत्यांशी संपर्क साधून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, काही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत महायुतीच्या नेतृत्वाला इशारा दिला आहे. निर्णय प्रक्रियेत आम्हाला गृहीत धरू नये आणि आमच्या राजकीय ताकदीचा योग्य सन्मान राखला जावा, अशी भूमिका त्यांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर आता महायुतीतील शिवसेना नेत्यांची स्वतंत्र बैठक होणार आहे. गोकुळ निवडणुकीसंदर्भातील पुढील भूमिका आणि नाराज नेत्यांची भूमिका यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज जिल्हा नियोजन समितीची बैठक असल्याने जिल्ह्यातील सर्व प्रमुख आमदार, खासदार आणि नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील हा नवा वाद कितपत वाढतो आणि नाराज नेत्यांची समजूत काढण्यात नेतृत्वाला यश येते का, याकडे आता जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा