Hello KolhapurNews

‘अंत्यविधीसाठी आला… अन् १८ लाखांचे दागिने घेऊन पळाला!’ कर्नाटकातील पाहुणा अटकेत… | Kolhapur Crime Jewellery Theft

Relative Attending Funeral Arrested for Stealing ₹18 Lakh Worth Jewellery in Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रविवारपेठ परिसरातील खाटीक गल्ली येथे घडलेल्या धक्कादायक चोरीच्या (Kolhapur Crime Jewellery Theft) प्रकरणाचा लक्ष्मीपुरी पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून, अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्यानेच घरातील सुमारे १८ लाख रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कर्नाटकातील बेळगाव येथील आशपाक ख्वाजासाब राठी (वय ३८) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारपेठ येथील इम्तियाज खाटीक यांच्या आईचे २२ एप्रिल रोजी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी कोल्हापूर शहरासह परिसरातील तसेच कर्नाटकातील अनेक नातेवाईक आणि पाहुणे खाटीक कुटुंबीयांच्या घरी आले होते. संशयित आशपाक राठी हाही नातेवाईकांच्या ओळखीने बेळगावहून येथे आला होता.

अंत्यदर्शन आणि धार्मिक विधी सुरू असताना सकाळी सुमारे १०.१५ ते दुपारी १२.३० या कालावधीत घरासमोरील अंगणात मृत महिलेचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यावेळी सर्व नातेवाईक आणि उपस्थित नागरिक अंत्यदर्शन व धार्मिक विधींमध्ये व्यस्त होते. याच संधीचा फायदा घेत संशयित आशपाक राठीने कोणाच्याही नजरेस न पडता घरात प्रवेश केला.

घरातील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील खोल्यांमध्ये जाऊन त्याने साहित्याची शोधाशोध सुरू केली. कपाटामध्ये ठेवलेले सुमारे १२ तोळे सोन्याचे दागिने त्याला मिळाले. दागिने ताब्यात घेतल्यानंतर तो कोणालाही संशय न येऊ देता तेथून पसार झाला. काही वेळानंतर घरातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर खाटीक कुटुंबीय आणि उपस्थित नातेवाईकांना मोठा धक्का बसला. दुःखाच्या प्रसंगी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातही खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर, उपनिरीक्षक मयुश्वरी खरात, मंगेश माने आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती व तपासाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचत चोरीचा उलगडा केला. तपासादरम्यान आरोपीने चोरी केलेले दागिने वितळवून त्याची सोन्याची लगडी तयार केल्याचे समोर आले. पोलिसांनी ही लगडी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, न्यायालयाने आरोपी आशपाक राठी याला ८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच त्याने कर्नाटकातील काही नातेवाईकांच्या घरातही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्या दृष्टीनेही तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी श्रीराम कण्हेरकर यांनी दिली.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा