₹७ हजारांच्या कर्जासाठी दीड लाखांची वसुली आणि जबरदस्तीने शरीरसंबंध.. इचलकरंजीतील धक्कादायक प्रकार! | Kolhapur Crime Money Lending Case
Kolhapur woman allegedly trapped in usury racket; over ₹1.5 lakh extorted and forced into exploitation over a ₹7,000 loan.

इचलकरंजी : इचलकरंजी शहरात अवैध सावकारी, आर्थिक शोषण आणि मानसिक छळाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, केवळ सात हजार रुपये उसने घेतलेल्या विवाहित महिलेला (Kolhapur Crime Money Lending Case) अवाजवी व्याजाच्या जाळ्यात अडकवून तब्बल दीड लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय कर्जाची परतफेड न झाल्याच्या कारणावरून संबंधित महिलेला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास प्रवृत्त करून त्यातून आर्थिक लाभ मिळवल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तक्रार दाखल होणार असल्याची माहिती मिळताच संशयित शहरातून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार उज्ज्वला बळिराम दोरूगडे (वय ३२), सर्जेराव कुंभार आणि विनायक पवार (सर्व रा. कबनूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये पीडित महिलेच्या पतीचा रिक्षा अपघात झाला होता. अपघातग्रस्त रिक्षेच्या दुरुस्तीसाठी आणि नुकसानभरपाईसाठी पैशांची तातडीची गरज निर्माण झाल्याने संबंधित कुटुंबाने सात हजार रुपये उसने घेतले होते.
मात्र काही दिवसांनंतर पीडित महिलेने दोन हजार रुपये परत करण्याचा प्रयत्न केला असता, ते पैसे मूळ कर्जाच्या रकमेत न धरता व्याज म्हणून स्वीकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपींनी दर आठवड्याला तब्बल तीन हजार रुपये व्याज देण्याची सक्ती केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कुटुंबाकडून वेळोवेळी रोख रक्कम तसेच ऑनलाईन व्यवहारांद्वारे पैसे घेतले गेले. या संपूर्ण कालावधीत व्याजाच्या नावाखाली तब्बल दीड लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
दरम्यान, कर्जाची रक्कम परतफेड करणे अशक्य होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी पीडितेच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना काम करण्यास भाग पाडल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर स्वतः पीडित महिलेलाही इचलकरंजीतील एका हॉटेलमध्ये काम करण्यास लावण्यात आले. कामाच्या ठिकाणी वारंवार शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक तसेच मानसिक छळ सहन करावा लागल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
याशिवाय कर्जाच्या बदल्यात महिलेला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या माध्यमातून आरोपींनी आर्थिक लाभ मिळवल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित तिघांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाची माहिती बाहेर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अवैध सावकारीच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांचे शोषण होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पोलिसांकडून फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे. तपासादरम्यान आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

