“कोल्हापूरवर भीषण पाणीसंकट; शहराचा पाणी उपसा पूर्णपणे बंद!” | Kolhapur Water Crisis
Kolhapur faces a severe water crisis as river levels fall drastically and water lifting for the city, industries, and villages comes to a halt.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यावर सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असून मान्सूनच्या विलंबामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. काळम्मावाडी (Kolhapur Water Crisis) धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने कोल्हापूर शहरासाठी सुरू असलेली थेट पाईपलाईन योजना ११ जूनपासून बंद आहे. त्यानंतर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पंचगंगा नदीवरील शिंगणापूर आणि भोगावती नदीवरील नागदेववाडी व बालिंगा या तीन उपसा केंद्रांवर अवलंबून राहावे लागले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत पंचगंगा आणि भोगावती नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने घटल्याने मंगळवारी सकाळपासून या तीनही केंद्रांवरील पाणी उपसा पूर्णपणे बंद करण्यात आला.
या उपसा केंद्रांमधून पाणी उचलण्यासाठी नदीतील पाणीपातळी किमान ५३५ मीटर असणे आवश्यक असते. मात्र सोमवारी दुपारपासून पाण्याची पातळी वेगाने कमी होत जाऊन ती ५३३.८० मीटरपर्यंत घसरली. परिणामी पाणी उपसा करणे अशक्य बनले आणि शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. उपसा बंद झाल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. उपलब्ध टाक्यांमधील मर्यादित पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागला. शहरातील अनेक भागांमध्ये दिवसभर पाणीपुरवठा खंडित राहिला, तर काही ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची वेळ आली.
या संकटावर उपाय म्हणून महानगरपालिकेने जलसंपदा विभागाशी समन्वय साधून धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती केली. त्यानुसार राधानगरी धरणातून १२३३ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. हे पाणी उपसा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागणार असून बुधवारी दुपारपर्यंत नदीपातळी वाढून उपसा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी शहराचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामध्येही दूधगंगा धरणातील साठा अवघ्या ८.७८ टक्क्यांवर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण ते राजापूर बंधारा परिसरातील शिरोळ तालुक्यातील सिंचन व औद्योगिक पाणी योजनांवर तातडीने उपसाबंदी लागू केली आहे. या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत.
पाणीटंचाईचा फटका केवळ शहरापुरता मर्यादित राहिलेला नसून औद्योगिक क्षेत्रालाही मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. दूधगंगा नदीतील पाणीपातळी गंभीररीत्या घटल्यामुळे सिद्धनेर्ली येथील पाणी उपसा केंद्रावरून होणारा एमआयडीसीचा सुमारे ४१० लाख लिटर दैनंदिन पाणी उपसा पूर्णपणे बंद झाला आहे. याचा थेट परिणाम कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, शिरोली औद्योगिक वसाहत तसेच कोल्हापूर विमानतळावर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागांचा पाणीपुरवठा ठप्प असून अनेक उद्योगांसमोर उत्पादन प्रक्रिया मर्यादित ठेवण्याचे संकट निर्माण झाले आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या सहा ग्रामपंचायतींनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक क्षेत्रासाठी प्रतितास सुमारे १४०० घनमीटर पाण्याची गरज असते. मात्र सध्या केवळ ६०० ते ७०० घनमीटर पाणी उपलब्ध होत असल्याने परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. प्रशासनाने उद्योगांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून पुनर्वापर व नियोजनावर भर देण्यास सांगितले आहे. पुढील दोन दिवसांत अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याने तोपर्यंत तीनही औद्योगिक वसाहतींना दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याचदरम्यान, इरिगेशन फेडरेशन आणि लाभधारक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दूधगंगा नदी वगळता इतर नद्यांवरील उपसाबंदी १७ ते १९ जून या कालावधीत तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. शेतीसाठी एक सिंचन आवर्तन देता यावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून २० जून रोजी धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. तसेच बिगर सिंचन वापरकर्त्यांनी सांडपाणी किंवा औद्योगिक प्रदूषित पाणी थेट नदीत सोडू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

