News

पेपरफुटीनंतर प्रश्नपत्रिका एअरफोर्सच्या विशेष विमानातून कोल्हापुरात, कडेकोट सुरक्षा व्यवस्था… | Kolhapur News NEET Re-Exam

NEET Re-Exam Papers Airlifted to Kolhapur Under Tight Security

कोल्हापूर : पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (Kolhapur News NEET Re-Exam ) आता येत्या रविवारी, २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. या पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य प्रशासनाने अभूतपूर्व खबरदारी घेतली असून प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाची मदत घेण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांसाठीच्या प्रश्नपत्रिका सोमवारी, १५ जून रोजी विशेष विमानाद्वारे कोल्हापूर विमानतळावर आणण्यात आल्या.

मे महिन्यात देशभरात घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेदरम्यान पेपरफुटी झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर संबंधित परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार २१ जून रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत सव्वातीन तासांची परीक्षा होणार आहे.

पुनर्परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि साठवणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी हवाई दलाच्या विशेष विमानाचा वापर करण्यात आला. सोमवारी सकाळी सुमारे पावणेबाराच्या सुमारास हे विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. विमानातून उतरवण्यात आलेल्या सीलबंद पेट्या थेट धावपट्टीवरून पोस्ट विभागाच्या विशेष वाहनांमध्ये ठेवण्यात आल्या.

यानंतर कडेकोट पोलिस बंदोबस्तात प्रश्नपत्रिका विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्या. सांगली जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांसाठीच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्र पोलिस ताफ्याच्या संरक्षणात सांगलीकडे पाठवण्यात आल्या. तर कोल्हापूर केंद्रांसाठीच्या प्रश्नपत्रिका शाहूपुरी परिसरातील दोन बँकांच्या कोषागारांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती.

प्रश्नपत्रिका ज्या बँकांच्या कोषागारात ठेवण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणीही कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीक्षा होणाऱ्या रविवारी सकाळी या प्रश्नपत्रिका पोलिस संरक्षणात कोषागारातून बाहेर काढून संबंधित परीक्षा केंद्रांवर पोहोचवण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीपासून ते परीक्षा केंद्रांपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पोस्ट विभागाचे प्रवर अधीक्षक वैभव वाघमारे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर यावेळी कोणतीही अनियमितता होऊ नये यासाठी प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा