39 वा राजर्षी ‘शाहू पुरस्कार’ पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना घोषित | Rajarshi Shahu Award 2025

कोल्हापूर | राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 2025 सालचा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार (Rajarshi Shahu Award) प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल (Jabbar Patel) यांना जाहीर करण्यात आला आहे. चित्रपट व नाट्य सृष्टीत त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुरस्काराची घोषणा केली. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. चौसाळकर, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण आणि उप पोलीस अधीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिष्ठेचा पुरस्कार
राजर्षी शाहूंनी लावलेली समाज प्रबोधनाची मशाल आणि पुरोगामी विचारसरणी जपण्याचे कार्य ट्रस्ट गेली 38 वर्षे करत आहे. 1984 पासून सुरु झालेल्या या पुरस्कारामार्फत समाजसेवा, शिक्षण, क्रीडा, साहित्य, संगीत, कला आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
डॉ. जब्बार पटेल : एक चिकित्सक ते जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक
डॉ. जब्बार पटेल यांचा जन्म 23 जून 1942 रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे झाला. त्यांनी एम.बी.बी.एस. आणि चाईल्ड हेल्थमध्ये पदविका मिळवून वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. मात्र, त्यांच्या आयुष्याचा खरा प्रवास रंगभूमी आणि चित्रपटाच्या दुनियेत घडला.
शालेय जीवनापासूनच रंगभूमीशी नातं जोडले गेलेलं असल्यामुळे त्यांनी 1970 मध्ये विजय तेंडुलकर लिखित ‘अशी पाखरे येती’ या नाटकातून दिग्दर्शनाच्या प्रवासाला सुरुवात केली. 1972 मध्ये त्यांनी ‘घाशीराम कोतवाल’ या क्रांतीकारी नाटकाची रंगमंचावर मांडणी करत जागतिक ओळख मिळवली. इंग्लंड, अमेरिका, रशिया, जर्मनी, कॅनडा यासह अनेक देशांमध्ये या नाटकाचे प्रयोग यशस्वी झाले.
सिनेसृष्टीत सशक्त पाऊल
1975 मध्ये ‘सामना’ या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केलं. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याची निवड झाली होती. ‘जैत रे जैत’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘एक होता विदुषक’, ‘मुक्ता’ यांसारख्या चित्रपटांनी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर प्रगल्भ मांडणी केली. ‘मुक्ता’ आणि ‘एक होता विदुषक’ या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.
महान व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपटांचे दिग्दर्शन
डॉ. पटेल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित इंग्रजी व नऊ भारतीय भाषांमधील चरित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट इंग्रजी चित्रपटासह अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ‘यशवंतराव चव्हाण’, ‘पु. ल. देशपांडे’, ‘कुसुमाग्रज’, ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी’, ‘स. मा. जोशी’ या दिग्गजांवर आधारित माहितीपट त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वाचे ठरले.
पं. कुमार गंधर्व आणि पं. शिवकुमार शर्मा यांच्यावरही त्यांनी माहितीपट सादर केले, जे विविध चित्रपट महोत्सवात निवडले गेले.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
त्यांना 1978 साली संगीत नाटक अकादमीचा सन्मान मिळाला. भारत सरकारने 1982 मध्ये ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. त्यानंतर पुण्यभूषण पुरस्कार (2002), विष्णुदास भावे पुरस्कार (2014) आदी अनेक सन्मान त्यांच्या झोळीत आहेत.
संस्थात्मक योगदान आणि महोत्सवांचे नेतृत्व
डॉ. पटेल हे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (PIFF) संचालक व अध्यक्ष आहेत. ते यशवंत, लातूर, नागपूर, चंद्रपूर चित्रपट महोत्सवांचेही नेतृत्व करतात. एमआयटीच्या फिल्म अॅन्ड थिएटर स्कूलच्या माध्यमातून तरुण कलाकारांना मार्गदर्शनही करतात.
50 वर्षांहून अधिक काळ समर्पित कार्य
नाट्य, चित्रपट, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली पाच दशके सक्रिय असलेल्या डॉ. जब्बार पटेल यांचे कार्य प्रेरणादायी आहे. राजर्षी शाहूंनी जपलेली समतेची आणि परिवर्तनाची चळवळ डॉ. पटेल यांच्या कारकिर्दीत प्रगल्भपणे उमटते, हीच या पुरस्कारामागील खरी प्रेरणा आहे.

