बातम्याशेती

उत्पादक व विक्रेत्यांनी लिंकिंग विरहित गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरवठ्याची खबरदारी घ्या – पालकमंत्री प्रकाश आबिटकर | Kolhapur Kharif Season 2025

कोल्हापूर | खरीप हंगामाच्या (Kolhapur Kharif Season 2025) पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील खत पुरवठा आणि वितरण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भूषवले. बैठकीत जिल्ह्यातील खतांची उपलब्धता, संभाव्य टंचाई, आवंटन नियोजन, वितरण प्रक्रियेतील अडथळे यावर सविस्तर चर्चा झाली.

पालकमंत्री आबिटकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा पुरवठा होणे आवश्यक असून, उत्पादक व विक्रेत्यांनी कोणतीही लिंकिंग न करता शेतकऱ्यांपर्यंत खत पोहोचवण्याची खबरदारी घ्यावी.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली की, मे अखेरीपर्यंत मंजूर खत आवंटनाच्या तुलनेत १०० टक्के पुरवठा पूर्ण झाला आहे. सध्या जिल्ह्यात १४,८६२ मेट्रिक टन युरिया, १,१६३ मेट्रिक टन डीएपी, ६,२१३ मेट्रिक टन एमओपी, २,६९७ मेट्रिक टन संयुक्त खते आणि ५,४४८ मेट्रिक टन एसएसपी असा एकूण ५४,५९९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.

शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेत खत वितरण प्रक्रियेत लिंकिंगविरहित गुणवत्तेवर भर द्यावा, अशी मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी निकृष्ट निविष्ठांच्या पुरवठ्यावर भरारी पथकांमार्फत कडक कारवाईचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्व खत विक्री केंद्रांवर जिल्हा तक्रार निवारण कक्षाचा मोबाईल क्रमांक व तक्रार नोंदविण्यासाठी QR कोड लावण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी कोणतीही तक्रार असल्यास ९५२९७७२५२१ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.

यावेळी मिश्र खत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी डीएपीच्या अपुऱ्या पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. कृषी विभागाने यावर उत्तर देताना सांगितले की, सध्या डीएपीचा पुरवठा काही प्रमाणात कमी असून, त्याऐवजी पर्यायी खतांचा वापर शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक करावा.

बैठकीला प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नामदेव परिट, कृषी विकास अधिकारी सारिका रेपे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक संभाजी शेनवे, विविध खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वितरक उपस्थित होते.

Back to top button