हॅलो कोल्हापूरबातम्या

Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीनं ओलांडली इशारा पातळी; राधानगरी, कोयना, अलमट्टीतून मोठा विसर्ग; कोकण-गोवा मार्ग बंद

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सोमवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढून ती इशारा पातळीच्या वर गेली आहे. आज सकाळी 10 वाजताच्या रिपोर्टनुसार पाणीपातळी 40 फूट आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फूट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 85 बंधारे पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील मडिलगे येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, राधानगरी धरणातील सातपैकी चार स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून तीन दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

कोकण-गोवा मार्ग बंद, आंबोली मार्गानेच वाहतूक सुरू

तळकोकण आणि गोव्याला जाण्यासाठी असलेले तीन प्रमुख मार्ग बंद झाले असून सध्या केवळ आंबोली घाटमार्गेच वाहतूक सुरू आहे. भुईबावडा व करूळ घाटात दरडी कोसळल्यामुळे रस्ता बंद आहे. तर फोंडा घाटात पुराचे पाणी आल्याने हा मार्गही बंद करण्यात आला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.

दि.20/08/2025
सकाळी 10:00 वा.
राजाराम बंधारा पाणी पातळी
40.00″ (542.38m)
विसर्ग 59682 cusecs
(नदी इशारा पातळी 39’00” व धोका पातळी 43’00”)
पाण्याखालील बंधारे – 78

धरणांतील विसर्ग

राधानगरी – 5784 क्युसेक
दूधगंगा – 25000 क्युसेक
वारणा – 39663 क्युसेक
कोयना – 95300 क्युसेक
अलमट्टी – 200000 क्युसेक
हिप्परगी – 82800 क्युसेक

कोयना धरणाचे दरवाजे उघडले
पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 13 फूट उघडण्यात आले आहेत. धरणातून तब्बल 95,300 क्युसेक पाणी सोडले जात असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
पूरस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले असून जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पूरस्थितीत घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अलमट्टी व हिप्परगी धरणांशी समन्वय ठेवून विसर्ग नियंत्रित करण्याचे काम सुरू असल्याचेही आबिटकर यांनी सांगितले. पूरस्थितीत जीवितहानी होऊ नये, यासाठी गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker