बातम्याहॅलो कोल्हापूर

माधुरी हत्तीसाठी वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं? | Madhuri Elephant Update News

कोल्हापूर | माधुरी हत्तीचा (Madhuri Elephant Update News) विषय शांत झाल्याचे वाटत असतानाच, वनताराची टीम आज (20 ऑगस्ट) पुन्हा नांदणीत दाखल झाली. त्यामुळे आजच्या भेटीत आणि मठाधिपतींशी झालेल्या बैठकीत नेमके काय घडले याची उत्सुकता समस्त कोल्हापूर जिल्हावासियांना लागून राहिली होती. या भेटीबाबतचा तपशील आता समोर आला आहे.

नांदणी (ता. शिरोळ) येथे माधुरी हत्तीच्या देखभालीसाठी आधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे, वनतारा टीमच्या आजच्या भेटीमुळे स्पष्ट झाले आहे. आज वनतारा जामनगरच्या वैद्यकीय व अभियंता विभागाच्या तज्ञांनी मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महाराज व मठाचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत मठाने दाखविलेल्या जागेची पाहणी केली.

मठाने सुमारे सहा एकर जागा या केंद्रासाठी उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी हत्तींच्या संगोपनासाठी सर्व सुविधा असलेले आधुनिक केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती जिनसेन भट्टारक महाराजांनी दिली. या केंद्रात हत्तींसाठी वैद्यकीय विभाग, हायड्रो थेरपीसह आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. नांदणी परिसरातील हवामान हत्तींसाठी अनुकूल असल्याचे वनताराच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपूर्वी पेटाच्या तक्रारीनंतर नांदणी मठातील माधुरी हत्तीला वनतारा, जामनगर येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती परत मिळावा, यासाठी मोठा जनक्षोभ उसळला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या बैठकीत नांदणी येथेच हत्ती पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या केंद्रातून नांदणी मठाचा माधुरी हत्तीच नव्हे तर सांगली, कोल्हापूर व सीमाभागातील इतर हत्तींचीही देखभाल, उपचार व सोशलायझेशन होणार आहे. यावेळी मठाचे विश्वस्त देखील उपस्थित होते.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker