बातम्याहॅलो कोल्हापूर

अभिमानास्पद! कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा; कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा | Kolhapur Shahi Dussehra Festival 2025

कोल्हापूर | कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव (Kolhapur Shahi Dussehra Festival) आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत अधिकृतरीत्या समाविष्ट झाला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या महोत्सवाला राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.

Kolhapur Shahi Dussehra Festival 2025

शाही दसरा महोत्सव हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून साजरा होत असून, म्हैसूरच्या दसरा उत्सवाप्रमाणेच कोल्हापूरचा महोत्सव राज्यात लोकप्रिय ठरत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक लोककला, लोकनृत्ये, शिवकालीन शस्त्रप्रदर्शन आणि युद्धकलांचे सादरीकरण करण्यात येते. यामुळे पारंपरिक कला जतन होऊन भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.

शारदीय नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात दरवर्षी 30 ते 40 लाख भाविक दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे, भवानी मंडप या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटनही 191 वर्षांपूर्वी याच दसरा सणादिवशी झाले होते. त्यामुळे यंदा 2 ऑक्टोबर रोजी भवानी मंडपाला 191 वर्षे पूर्ण होत आहेत.

कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध असून पन्हाळगड किल्ला, नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेला मराठा लष्करी भूप्रदेश, श्री क्षेत्र जोतिबा मंदिर, दाजीपूर अभयारण्य, कणेरीमठ, आंबा घाट तसेच खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर यांसारखी ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. त्यासोबतच येथे हॉटेल्स, लॉजिंग आणि धर्मशाळांची सोय मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर पर्यटक कोल्हापूरमध्ये मुक्काम वाढवतील आणि आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांनाही भेट देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार वाढण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा अंदाज आहे.

Kolhapur Shahi Dussehra Festival 2025
Kolhapur Shahi Dussehra Festival 2025

2023 साली दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची घोषणा झाली होती. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनाचे लक्ष वेधले. अखेर 11 सप्टेंबर रोजी पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या परिपत्रकाद्वारे कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाचा ‘राज्य महोत्सव’ म्हणून समावेश झाला. यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे मानले जात आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker