अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स बंद केला होता? रोहित पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी अद्यापही अनेक अनुत्तरित प्रश्न कायम आहेत. हा अपघात होता की घातपात, यावरून राजकीय आणि सार्वजनिक पातळीवर तीव्र चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत काही माध्यमांनी धक्कादायक दावे केल्यानंतर संशय अधिक गडद झाला आहे. सूत्रांच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला आहे की अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असून, पुढील तपासणीसाठी तो विदेशात पाठवण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार Rohit Pawar यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकार, तपास यंत्रणा आणि संबंधित खासगी कंपनीवर थेट संशय व्यक्त केला. “ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. काही जण म्हणतात त्याप्रमाणे जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल, तर खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून लोकांमध्ये कारणे पेरली जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे चौकशी होऊ शकत नसेल, तर “हा अपघात नव्हता, हा घातच होता,” असे स्पष्टपणे म्हणण्यास वाव मिळतो, असेही रोहित पवार यांनी ठामपणे सांगितले.
रोहित पवार पुढे म्हणाले की, “स्व. Ajit Pawar यांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली आहे. मात्र तपास यंत्रणांना अद्याप ती समजलेली दिसत नाही. या दुर्दैवी घटनेला २० दिवस उलटून गेले तरीही तपासाला वेग आलेला नाही.” त्यांनी खासगी VSR कंपनीवरही बोट ठेवले. “पुरावे नष्ट करता यावेत म्हणून तर उशीर केला जात नाही ना? कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे का, असे प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत,” असे ते म्हणाले.
ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या बातम्यांमुळे आपण काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेली शक्यता खरी ठरत असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. “आम्ही शांत बसणार नाही. हा अपघात होता की घात, याचे उत्तर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. दोन दिवसांत पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करू,” असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणात रोहित पवारांनी थेट Directorate General of Civil Aviation (DGCA) वरही संशय व्यक्त केला आहे. “अपघाताला आज विसावा दिवस आहे, तरीही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर झालेला नाही. तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करून विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही,” असे त्यांनी सांगितले. यामुळे शंका अधिक बळावत असल्याचे त्यांनी नमूद केले आणि DGCA ने तातडीने प्राथमिक अहवाल जाहीर करून संबंधित कंपनीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली.
एकूणच, ब्लॅक बॉक्सच्या स्थितीवरून सुरू झालेली चर्चा आता तपासाच्या पारदर्शकतेवर, नियामक संस्थांच्या भूमिकेवर आणि खासगी कंपनीच्या जबाबदारीवर केंद्रित झाली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

