Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्या

Ajra Crime News : मडिलगे येथे घरावर दरोडा, मारहाणीत महिलेचा मृत्यु, पतीही जखमी

मडिलगे (ता. आजरा) | येथील एका घरावर अज्ञात दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास हल्ला करत महिलेचा खून केला असून, तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे (Ajra Crime News) परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रविवारी (दि. १८) रात्री सुमारे अडीच वाजता ही धक्कादायक घटना घडली. पुजा सुशांत गुरव (वय ३१) यांचा हल्ल्यात मृत्यू झाला असून, त्यांचे पती सुशांत सुरेश गुरव (वय ३२) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरव कुटुंब नेहमीप्रमाणे रात्री मुलांसह घरी झोपले होते. सुशांत गुरव प्रातःविधीसाठी उठल्यानंतर पत्नीच्या जोरात किंचाळण्याचा आवाज आला. यावेळी घराचे दोन्ही दरवाजे उघडे असल्याचे दिसून आले. आत पाहिल्यानंतर चार अज्ञात व्यक्ती पुजा यांना मारहाण करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.

दरोडेखोरांनी पुजा यांच्याजवळील दागिने, गुरव यांच्या गळ्यातील सोनसाखळी, तसेच बॅगेतील रोख रक्कम व दागिने लुटून घटनास्थळावरून फरार झाले. घटनेनंतर सुशांत गुरव यांनी मुलांना घेऊन आरडाओरडा केल्यावर शेजारी मदतीला धावले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकाच्या सहाय्याने तपास सुरु असून, गुरव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही खळबळजनक घटना समजताच मडिलगे पंचक्रोशी हादरून गेली आहे. पोलिसांकडून तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker