Kolhapur Crime News | मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले
Kolhapur Crime | कोल्हापूरच्या आर. के. नगर परिसरात एका दुर्दैवी घटनेने हळहळ पसरली आहे. आकाश शांताराम बोराडे (वय 23), मूळचा धाराशिव जिल्ह्यातील कतराबाद येथील आणि सध्या कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या तरुणाने मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले.
करवीर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, घटनास्थळी पोलिसांनी चार पानी सुसाईड नोट हस्तगत केली आहे. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी ही माहिती दिली. आकाश सध्या के. आय. टी. महाविद्यालयात एमबीएच्या अंतिम वर्षात शिकत होता. त्याने नुकतीच अंतिम परीक्षा दिली होती आणि एका नामांकित मॉलमध्ये विभाग प्रमुख पदासाठी त्याची निवडही झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या एका जवळच्या मित्राकडून त्याला सातत्याने त्रास होत होता. हा त्रास काही नातेवाईकांना सांगितल्यानंतरही त्यावर तोडगा निघाला नाही. उलट त्रास वाढत गेला आणि अखेर पिडीत तरूणाने हा धक्कादायक निर्णय घेत आपले जीवन संपवले.
घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने त्रासदायक व्यक्तींचा स्पष्ट उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांना देण्यात आला असून, तो धाराशिवकडे नेण्यात आला आहे. नातेवाईक शनिवारपर्यंत कोल्हापुरात परतल्यानंतर त्यांच्या जबाबानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे आर. के. नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक हुशार, मेहनती तरुण केवळ मानसिक त्रास सहन न झाल्याने आयुष्य संपवतो, ही बाब मन हेलावणारी आहे.


