कोल्हापूरच्या मातीतील हिंदी सिनेमा ‘बारदोवी’ प्रदर्शनासाठी सज्ज | BARDOVI
कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला आणि अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांच्या दमदार अभिनयाने नटलेला बारदोवी हा पूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अलीकडेच त्यांची भूमिका असलेला चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम त्यांच्या कारकिर्दीतील नव्या जबाबदारीसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
अभिनेत्री म्हणून रूपेरी पडदा गाजवल्यानंतर छाया कदम यांनी सिनेनिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. \’BARDOVI\’ या आगामी चित्रपटाची सहनिर्मिती छाया कदम यांनी केली असून, या चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. कोल्हापूरच्या स्मशानभूमीत तयार झालेला हा पूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट असून चित्रपटाची निर्मिती करणारी बहुतांशी टीम कोल्हापूरातीलच आहे.
‘बारदोवी’ चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर नुकतचं लाँच करण्यात आलं आहे. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत बारदोवी या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित वायकर, संदीप काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. संतोष बळीराम तांबे, रविराज वायकर, अभिजित पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत.
दादासाहेब फाळके उत्कृष्ट दिग्दर्शक (ज्युरी अॅवार्ड) पुरस्कार प्राप्त करण शिवाजीराव चव्हाण यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचं छायाचित्रण विक्रम पाटील, तर कार्यकारी निर्माता म्हणून विकास डीगे यांनी कामगिरी पार पाडली आहे. यापूर्वी या त्रिकूटानं इमेगो या विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाची निर्मिती केली आहे.
छाया कदम यांची आतापर्यंतची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि वेगळ्या धाटणीची असते. सर्वच भूमिकांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. छाया कदम यांची आजवरची चित्रपट कारकिर्द पाहता त्यांनी निर्मितीसाठी आणि अभिनेत्री म्हणून निवडलेला बारदोवी हा चित्रपट त्यांच्या दमदार अभिनयाला साजेशा धाटणीचा असल्याचा अंदाज पोस्टरवरून व्यक्त केला जात आहे. छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत. हा चित्रपट नजीकच्या सिनेमागृहात 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. छाया कदम यांची मुख्य भूमिका आणि त्यांची पहिलीच सहनिर्मिती असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.


