एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा आरक्षणाच्या खोट्या प्रचाराची हवाच काढली.. काय म्हणाले वाचा सविस्तर! Eknath Shinde

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय २०१२ मध्ये घेण्यात आलेला आहे. नवीन काही आम्ही केलेले नाही. फक्त प्रक्रिया सोपी केली असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार बैठकीत ते बोलत होते. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे काही काढून घेतले नाही. हा निर्णय घेण्याआगोदर मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा झाली होती, असा दावा शिंदे यांनी केला.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकाच विधानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) खोट्या प्रचाराची हवाच काढून टाकली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना अध्यादेशाद्वारे फसवण्यात आले होते. हे देखील अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे!
शब्दछल करण्यात पटाईत असलेल्या फडणवीसांची अशी पुरती पंचाईत करण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी दाखवले त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यापासून त्यांनी आणलेल्या कल्याणकारी योजना बंद करणे, त्यांचे कार्यकाळातील निविदा प्रक्रिया पुनश्च राबवणे, निर्णयांची चौकशी लावणे अश्या अनेक कारस्थानांमुळे शिंदे पुरते वैतागले आहेत.
वारंवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेकडे तक्रारी करुनही शहा हात वर करत आहेत. यापुढे मुंबई असो की ठाणे किंवा विधानसभा, प्रत्येक निवडणुकीत शतप्रतिशत भाजपा हेच सूत्र ठरलेले आहे. शिंदेनी खासदार घेऊन चुळबूळ करण्याचा प्रयत्न केला तर धनुष्यबाण ठाकरेंकडे जाईल किंवा गोठवला जाईल. असे धमकावून शिंदेना भाजपमध्ये विलीनीकरणाचा प्रस्तावही दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने मिळालेली आहे.
वास्तविक काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातच मराठा आरक्षण व विदर्भ मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात वंशावळ शोधून कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेस गती मिळाली. त्याआधी २००४ मध्ये काँग्रेस नेते व तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विदर्भ मराठवाडय़ात कुणबी प्रमाणपत्रासाठी निर्णय घेतला होता.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कुणबी मराठा असणे जातीच्या पातळीवर मागासलेपणाचे लक्षण आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता कुणबी वंशावळ असलेल्यांनीही कुणबी प्रमाणपत्राकडे पाठ फिरवली होती.
२०१४ नंतर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांची व ओबीसींची वारंवार फसवणूक करुन मराठा विरुध्द ओबीसी जाती ध्रुवीकरण करण्यासाठी दोन्हीकडच्या वाचाळवीरांना रसद व मेडीया फुटेज मिळण्याची सोय केली आहे. अगोदर जरांगे पाटील विरुध्द भुजबळ आणि आताही स्वयंघोषित ओबीसी नेते फडणवीसांच्या जीवावरच बोलत आहेत.
नवी मुंबईत मनोजदादा जरांगे पाटील यांची फसवणूक झाली होती. आझाद मैदानावरही फसवणूकच झाली. तेव्हाही ते अभ्यासकांचे न ऐकता गुलाल उधळून रिकामे झाले. आताही तेच सुरु आहे. निश्चितपणे त्यांनी गरजवंत मराठा कुटुबांची मने जिंकली आहेत. त्यामुळे त्यांना समाजमनाचा पाठिंबा आहे. पण सोबत वकील असूनही ते वारंवार फसले का जात आहेत? हे आश्चर्यकारक आहे.
एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेबद्दल मतभेद निश्चितपणे असू शकतात, असावेत. पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असल्याने खोटे बोलण्यापेक्षा सत्य बोलण्याचे दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरते. या विधानानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असे स्पष्टीकरणही शिंदे कदाचित देतील. पण या विधानाने त्यांनी महाराष्ट्राला, इंडिया आघाडीला जो संदेश द्यायचा आहे तो दिला आहे.
सत्याच्या मार्गाने केलेले राजकारण, समाजकारण पद गेल्यानंतरही दिर्घकाळ प्रतिष्ठा टिकवून ठेवते. याची अनुभूती शिंदेना फारच लवकर आली. याबद्दलही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.
– तुषार गायकवाड