हॅलो कोल्हापूर

करवीर छत्रपती लोकशाही मार्गाने सक्रिय राजकारणात येत असल्याचे पाहून काहींच्या पोटात गोळा!

करवीर छत्रपती लोकशाही मार्गाने सक्रिय राजकारणात येत असल्याचे पाहून काहींच्या पोटात गोळा आलेला आहे. यातून छत्रपती घराण्याची बदनामी करण्याचा काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत.

छत्रपती घराण्याचे संस्कार कोणावरही टीका करण्याचे नसल्याने आम्ही गप्प होतो, परंतु सध्या लोकांच्यात संभ्रम निर्माण होत असल्याने आमचे कर्तव्य म्हणून हा लेख लिहीत आहोत.

टीकाकारांचे प्रश्न आणि त्याचे उत्तर

प्रश्न: करवीर छत्रपती घराण्यात दत्तक अनेक राजे दत्तक आल्याने त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीच संबध नाही.

उत्तर: हिंदू धर्मानुसार एखादा राजा निपुत्रिक असल्यास आपले राज्य पुढे चालवण्यासाठी दत्तक घेण्याचा अधिकार असतो. यानुसार जवळच्या नात्यातील उदा. भावाचा मुलगा, चुलत्याचा मुलगा, भावकीतला मुलगा, अथवा बहीणीचा मुलगा, मुलीचा मुलगा घेण्याची पुर्वापार पध्दत आहे. आणि याला धर्मशास्त्र मान्यता देते. असे असताना विनाकारण दत्तक विषय काढून हि दत्तक गादी आहे असा अपप्रचार केला जात आहे.

जे हा प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना हिंदू धर्मातील प्रथा परंपरा मान्य नाहीत का? (हिंदू धर्मानुसार दत्तक मुलगा हा राजाचा खरा वारसच समजला जातो). ज्यांना हिंदू धर्मातील प्रथा परंपरा मान्य नाहीत त्यांनी स्वतःच धर्मांतर करुन दुसऱ्या धर्मात खुशाल जावे. (दुसऱ्या धर्मात दत्तक विधानाला मान्यता नाही)

राहीला प्रश्न करवीर छत्रपती घराण्यातील दत्तक वारसांचा तर, कोल्हापूरचे पहिले शिवाजी यांचा एक मुलगा सातरच्या गादीवर सातारच्या शाहू महाराजांनी घेतला होता. त्यानंतर दोन्ही गाद्यांवर अनेकवेळा दत्तक वारस बसले आहेत. परंतू गादीवर बसल्यावर प्रत्येक छत्रपतींनी आपले कार्य छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांच्या कार्याला शोभेल असेच केले आहे.

प्रश्न: सध्याचे शाहू महाराजांचे समाजासाठी योगदान काय?

हा प्रश्न विचारणाऱ्यांना आपण पहिला प्रश्न विचारला पाहीजे; कि तुझे समाजासाठी योगदान काय?

उत्तर: छत्रपती घराण्याने कायमच लोकहितासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. कोविडच्या काळात सर्व जग थांबले असताना, फक्त महापालिकेच्या विनंतीवरून ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये म्हणून जनरेटर उपलब्ध करून देणे, किंवा महापुरात बेघर झालेल्या लोकांना आश्रय देऊन त्यांच्या निवाऱ्याची, जेवणाची, नाश्त्याची अगदी घरच्यासारखी सोय करणारे महाराज सर्व कोल्हापूरकरांनी पाहिले आहे. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाराजांनी आपले अमूल्य योगदान दिले आहे. अनेक कलाकारांना, क्रीडापटूंना राजाश्रय देऊन मदत केली आहे.

महाराजांचे थोरले पुत्र युवराज संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले योगदान तर सर्वश्रुत आहे. महापुराने हाहाकार उडाला असताना जीवित हानी होऊ नये म्हणून, एन डी आर एफ ची मोठी फौज घेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांना मदत करणारे छत्रपती साऱ्या जगाने पाहिले आहेत.

महाराजांचे धाकटे पुत्र माजी आमदार मालोजीराजे यांनी आमदारकीच्या काळात सर्व तालीम संस्थांना केलेली मदत आजही कोल्हापूरकर विसरलेले नाही. छत्रपती घराण्याचा लोकसेवेचा वारसा आजही अखंडपणे संभाळणारे हे घराणे कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

प्रश्न: कोल्हापूर चे राजघराणे हिंदूत्व विरोधी आहे?

उत्तर: ही टीका तर हास्यास्पद आहे, यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे.
2007 पासून हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन शाहू महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव युवराज संभाजीराजे करतात. शिवछत्रपतींचे विचार सर्वदूर पोहोचण्यासाठी, त्याचा प्रचार व्हावा यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. शिवछत्रपतींचे विचार पोहोचवणे म्हणजेच एका अर्थाने हिंदुत्वाचे विचार पोहोचवणे असे यांना वाटत नाही का?

राजकारणात टीका जरूर करावी, परंतु टीकेला आधार असावा. छत्रपती घराण्यावर टीका करण्यास काहीच सापडत नाही म्हंटल्यावर इतिहासातील दाखल्यांचा, सोयीचा अर्थ काढून लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु कोल्हापूरकर सुज्ञ आहेत, अशा टीकांना भीक न घालता, लोकसेवेचा वारसा अखंड तेवत ठेवतील यात शंका नाही.
फुटका रेडिओ

Source
Prabhakar Patil
Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker