बातम्याहॅलो कोल्हापूर

कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाचा थरार! चार महिला जखमी, दुचाक्यांचे नुकसान; संतप्त जमावाकडून चोप | Kolhapur Accident News

Kolhapur Accident News | कोल्हापूरच्या नेहमीच वर्दळीच्या असलेल्या महाद्वार रोडवर मंगळवारी सायंकाळी चांगलाच थरार पाहायला मिळाला. एक मद्यधुंद कारचालक भरधाव वेगाने गाडी चालवत महाद्वार रोडवर घुसला आणि चार महिलांना धडक देत, अनेक दुचाकींना जोरात ठोकरत निघून गेला. यामुळे परिसरात काही काळ प्रचंड घबराट पसरली.

घटनेनंतर तात्काळ सतर्क झालेल्या वाहतूक पोलिसांनी आणि नागरिकांनी कारचा पाठलाग करून चालकाला रोखले. प्रसंगावधान राखत धाडसी कृती केलेल्या वाहतूक शाखेच्या हवालदार मंजुनाथ बेळमकर आणि संतोष करनूरकर यांच्या मदतीने ही मोटार अखेर रोखण्यात यश आले.

या दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकांनी मद्यधुंद चालकाला कारमधून खेचून बाहेर काढले आणि कपडे फाटेपर्यंत चोप दिला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि ताब्यात घेतले.

तपासात, हा मद्यधुंद तरूण सांगली येथील प्रसाद दत्तात्रय सुतार (वय 29, रा. वखारभाग) असल्याचे समोर आले. तो मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. त्याच्यासोबत आणखी एक साथीदारही होता, त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्यामाहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पापाची तिकटीकडून महालक्ष्मी मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या महाद्वार रोडवर ही घटना घडली. याचवेळी भाविक, महिला, व्यापारी आणि नागरिकांची प्रचंड गर्दी होती. अचानक भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या चार महिलांना धडक दिली. त्या खाली पडल्या, परंतु सुदैवाने प्राणहानी टळली.

घटनास्थळी दाखल झालेल्या जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले की, या कारमुळे सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, चालकास शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

महाद्वार रोडसारख्या गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांत तीव्र संताप असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker