Kolhapur Crime News: फुलेवाडी रिंग रोडवर पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर | फुलेवाडी रिंग रोड परिसरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेने (Kolhapur Crime News) संपूर्ण परिसर हादरला आहे. गंगाई लॉनजवळ रात्री साधारण दीडच्या सुमारास झालेल्या सशस्त्र हल्ल्यात महेश राख या २७ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार मारण्यात आले असून, या हल्ल्यात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुने वैमनस्य डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आला होता. हल्ल्यात सिद्धांत गवळी, आदित्य गवळी, धीरज शर्मा, ऋषभ साळुंखे, मयूर कांबळे, पियूष पाटील, सद्दाम कुंडले यांच्यासह काही जण सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे. तलवार, एडका, फायटर, लोखंडी गज अशा घातक शस्त्रांचा वापर करून हा हल्ला करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, करवीर पोलीस ठाण्यात वरील सात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्येच्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मध्यरात्री उशिरा घडलेल्या या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.