Hello KolhapurNews

विक्रमनगरात गँगवॉरचा रक्तरंजित शेवट; तीन महिन्यांच्या वैरातून सोहेबचा खून | Kolhapur Crime Vikramnagar Murder

Three-Month-Old Rivalry Ends in Fatal Gang Attack in Kolhapur’s Vikramnagar

कोल्हापूर : विक्रमनगर परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या खूनाच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून, या प्रकरणामागे तीन महिन्यांपासून सुरू असलेला जुना वाद कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रिक्षाचालक सोहेब आणि त्याचा मित्र यांनी किरकोळ कारणातून संशयित आदित्य ओव्हळ (Kolhapur Crime Vikramnagar Murder) याच्यावर तीन महिन्यांपूर्वी चाकूहल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही गटांमधील वाद केवळ प्रत्यक्ष संघर्षापुरता मर्यादित न राहता सोशल मीडियावरही पोहोचला होता. एकमेकांना खुन्‍नस देणे, उघडपणे आव्हाने देणे आणि वैर अधिक तीव्र होणे यामुळे हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत गेला.

पोलिस तपासात आदित्य ओव्हळ हाच या संपूर्ण कटाचा मास्टरमाईंड असल्याचे निष्पन्न झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्याने सोहेबवर सातत्याने पाळत ठेवली होती. यासाठी त्याने विक्रमनगर येथील आयुष माने याच्यावर विशेष जबाबदारी सोपवली होती. सोमवारी रात्री सोहेब परिसरात आल्याची माहिती आयुषने आदित्यला दिली. त्यानंतर आदित्य आपल्या अन्य चार साथीदारांसह घटनास्थळी पोहोचला. पोलिसांच्या माहितीनुसार, या गटाचा उद्देश केवळ मारहाण करणे नसून सोहेबचा खून करण्याचाच होता.

तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादात सोहेबने आदित्यच्या पापणीवर आणि डोळ्यावर चाकूने वार केला होता. त्या हल्ल्यात आदित्य गंभीर जखमी झाला होता. याच घटनेचा राग मनात धरून आदित्यने सोमवारी झालेल्या हल्ल्यात सर्वप्रथम सोहेबच्या डोळ्यावरच वार केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

हल्ला झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसून आले. घटनास्थळी रक्ताचे थारोळे पडले होते. याशिवाय तेथे मद्याच्या बाटल्यांचाही खच आढळून आला. घटनेनंतर पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा केले असून, खुनात वापरण्यात आलेली मोटार आणि हत्यारे शोधण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, विक्रमनगर परिसरात गेल्या पाच महिन्यांत घडलेला हा तिसरा खून आहे. ४ जानेवारी रोजी आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून विकास भोसले याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्या प्रकरणात ओंकार काळे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २२ एप्रिल रोजी मद्यप्राशन करून घरात धिंगाणा घालणाऱ्या जुनेद गफूर पठाण (वय २२) याचा त्याच्या वडिलांनीच खून केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणात गफूर सुलतान पठाण याला पोलिसांनी अटक केली होती.

आता सोमवारी रात्री गँगवॉरमधून झालेल्या सोहेबच्या खुनामुळे विक्रमनगर परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलग घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा