Hello KolhapurNews

गोकुळच्या ७०० दूध संस्थांवर अपात्रतेची टांगती तलवार; पुढील आठवड्यापासून निकाल जाहीर | Kolhapur Eligibility Verification

Hundreds of milk societies linked to Gokul face uncertainty as scrutiny of eligibility criteria reaches its final stage.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संस्थांच्या पात्रता-अपात्रतेच्या प्रक्रियेला निर्णायक वळण मिळाले असून अवसायन प्रक्रियेतील १,३२० दूध संस्थांपैकी सुमारे ७०० संस्थांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंगळवारी (दि. ९) या प्रकरणातील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सहायक निबंधक कार्यालयाकडून निकालपत्र (Kolhapur Eligibility Verification) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. पुढील आठवड्यापासून संबंधित दूध संस्थांना निकाल देण्यास सुरुवात होणार असल्याने संपूर्ण गोकुळ वर्तुळाचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे.

गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या दूध संस्थांच्या पात्रतेबाबत आक्षेप घेत तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी १,३२० दूध संस्थांबाबत विविध मुद्द्यांवर आक्षेप नोंदविला होता. या प्रकरणाची दखल घेत कोल्हापूर सर्किट बेंचने संबंधित सर्व संस्थांची सुनावणी पूर्ण करून ८० दिवसांच्या आत त्या पात्र आहेत की अपात्र, याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या अडीच महिन्यांपासून सुनावणी प्रक्रिया सुरू होती. मंगळवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली असून आता अंतिम निकाल जाहीर करण्याची तयारी सुरू आहे.

दूध संस्थांच्या पात्रतेचा निर्णय घेताना काही महत्त्वाच्या अटींची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये दररोज किमान ५० लिटर दूध संकलनाची अट पूर्ण होते का, संस्थेचे नियमित लेखापरीक्षण झाले आहे का आणि संस्थेची निवडणूक वेळेत झाली आहे का, या प्रमुख बाबींचा विचार केला जाणार आहे. या निकषांपैकी विशेषतः दूध संकलनाच्या अटीबाबत अनेक संस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे. बहुतांश संस्थांचे दूध संकलन ५० लिटरपेक्षा कमी असल्याची चर्चा सुरू असल्याने मोठ्या संख्येने संस्था अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, यापूर्वी गैरहजर राहिलेल्या ३६ संस्थांना मंगळवारी सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी पुन्हा पत्र पाठविण्यात आले होते. मात्र त्यापैकी केवळ सात संस्थाच सुनावणीस हजर राहिल्या. उर्वरित २९ संस्थांनी दुसऱ्यांदाही सुनावणीकडे पाठ फिरविली. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दोन वेळा नोटीस देऊनही एकूण ५५ संस्था सुनावणीस गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय तत्कालीन सहायक निबंधक सुजय कदम यांनी दिलेल्या २६७ संस्थांच्या निकालांवरही वाद निर्माण झाला आहे. या प्रक्रियेवर प्रकाश बेलवाडे यांनी आक्षेप घेत सहनिबंधक प्रज्ञा तायडे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर सध्या स्वतंत्र सुनावणी सुरू असून आज, बुधवारी (दि. १०) या २६७ संस्थांबाबत पुढील सुनावणी होणार आहे.

गोकुळशी संबंधित अन्य महत्त्वाच्या प्रकरणांवरही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. गोकुळवर नियुक्त करण्यात आलेला प्रशासक हटविण्याच्या मागणीसंदर्भात माजी संचालकांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज, बुधवारी (दि. १०) सुनावणी होणार आहे. तसेच संचालकांच्या अपात्रतेसंदर्भात प्रकाश बेलवाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या, गुरुवारी (दि. ११) सुनावणी होणार असून या दोन्ही प्रकरणांकडेही जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा