Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्याहॅलो कोल्हापूर

Kolhapur extortion case : व्यावसायिकाकडे ३ कोटींच्या खंडणीची मागणी; स्नेहा नारकरसह पाच जणांविरोधात गुन्हा

कोल्हापूर | हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील व्यावसायिक आनंद श्रीनिवास मर्दा (वय ४७) यांच्याकडे तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी (Kolhapur extortion case) मागितल्याप्रकरणी कोल्हापूरच्या स्नेहा संजय नारकरसह आणखी चौघांविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मर्दा यांनी सोमवारी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

स्नेहा नारकर ही सध्या जयसिंगपूर येथील नितीन जंगम यांना फसवणुकीच्या प्रकरणात लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात आहे. मर्दा यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, नारकरने सुरुवातीला त्यांच्याशी ओळख वाढवून आपण कोल्हापूरमधील एका नामांकित बँकेत क्रेडिट मॅनेजर पदावर कार्यरत असल्याचा बनाव केला. यानंतर तिने व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचं तसेच बँकेच्या तारणातील सोनं लिलावात कमी किमतीत मिळवून देण्याचं आमिष दाखवून विश्वास संपादन केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे ते २५ मे २०२५ या काळात स्नेहा नारकर हिने मर्दा यांच्याकडे थेट ३ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून सामाजिक आणि कौटुंबिक त्रास देण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणात स्नेहा नारकर, शांताबाई वाळकुंडे (रा. यशवंतनगर, इचलकरंजी), संतोष पाटील (रा. चिपरी, ता. शिरोळ), शेखर गाडेकर (रा. जयसिंगपूर), आणि नारकरचा कार चालक रामचंद्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहापूर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून उर्वरित संशयितांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, स्नेहा नारकर ही याआधीही अशाच प्रकारच्या फसवणुकीप्रकरणी अटकेत आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा