विशाळगड येथे बकरी ईद व उरसासाठी कुर्बानीला न्यायालयाची सशर्त परवानगी | Vishalgad Fort

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावर (Vishalgad Fort) असलेल्या हजरत पीर मलिक रेहान दर्ग्यावर बकरी ईद (७ जून) आणि उरस (८ ते १२ जून) निमित्त प्राण्यांच्या कुर्बानीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे.
या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर झाली. विशाळगड किल्ल्यावर पशुबळीवर बंदी असल्यामुळे दर्गा ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या वेळी याचिकादारांच्या वतीने ॲड. सतीश तळेकर व ॲड. माधवी अय्यपन यांनी युक्तिवाद केला. तर, राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील पी. पी. काकडे आणि ॲड. कविता सोळुंके यांनी बाजू मांडली.
याचिकादारांनी न्यायालयात सांगितले की, कुर्बानी ही दर्ग्यापासून सुमारे १.४ किमी अंतरावर असलेल्या गट क्रमांक १९ मधील मुबारक मुजावर यांच्या खासगी व बंदिस्त जागेत दिली जाईल. यावर खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून कुर्बानीस ७ ते १२ जूनदरम्यान परवानगी दिली. मात्र यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
या अटींमध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, सार्वजनिक किंवा खुल्या जागी कुर्बानी करता येणार नाही. कुर्बानी ही केवळ खासगी आणि बंदिस्त जागेतच द्यावी लागेल. याशिवाय न्यायालयाने गतवर्षी याच प्रकरणात दिलेल्या आदेशातील सर्व अटींचे पालन यंदाही करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.
दर्गा ट्रस्टच्या याचिकेमुळे यंदाही भाविकांना बकरी ईद आणि उरसाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक विधी पार पाडता येणार आहेत. मात्र, न्यायालयाच्या अटींचा काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असणार आहे.