Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्याहॅलो कोल्हापूर

Kolhapur Crime: 10 लाखाच्या हुंड्यासाठी 7 महिन्याच्या गर्भवती पत्नीचा छळ; पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकी, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

कोल्हापूर | पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार (Kolhapur Crime) समोर आला आहे. वरणगे पाडळी (ता. करवीर) येथे एका गर्भवती महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करत तिच्याकडून १० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पीडित महिलेने करवीर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून, पतीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला नर्सिंगचं शिक्षण घेत असताना रोहित अर्जुन दुधाणे (रा. मधली गल्ली, वरणगे पाडळी) याच्याशी तिची ओळख झाली. हळूहळू ही ओळख प्रेमात रूपांतरित झाली आणि मे २०२४ मध्ये दोघांनी प्रेमविवाह केला. काही महिन्यांनंतर म्हणजेच ऑक्टोबर २०२४ मध्ये पत्नी गर्भवती राहिली. मात्र, त्यानंतर तिच्या आयुष्यात नवे वादळ निर्माण झाले आहे.

गर्भधारणेनंतर रोहितच्या वागणुकीत प्रचंड बदल झाला. त्याने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. ‘मला सध्या मूल नको, तू गर्भपात कर, माहेरी निघून जा, लग्नात काही दिलं नाही, इथे राहायचं असेल तर १० लाखांचा हुंडा घेऊन ये,’ अशा धमक्या देत तो तिला सतत त्रास देत होता. इतकंच नाही, तर एकदा पोटावर लाथा मारत ठार मारण्याची धमकीही त्याने दिली, असा गंभीर आरोप पीडित महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने बुधवारी (दि. ४ जून) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ रोहित दुधाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

रोहित दुधाणेचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध; लॉजमध्ये रंगेहाथ सापडला

दरम्यान, रोहित दुधाणे याचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही पीडित पत्नीने केला आहे. तिच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी तो हणबरवाडी येथील एका लॉजमध्ये एका महिलेसोबत आढळून आला. याबाबत इस्पुर्ली पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कायदा आणि समाजमन या दोघांसाठीही ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ अशा गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी समाजातून केली जात आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker