बातम्याहॅलो कोल्हापूर

Kolhapur Newborn Death : पुरामुळे डोळे उघडण्याआधीच मिटले, वैद्यकीय सुविधेअभावी वाटेतच महिलेची प्रसुती; नवजात बालकाचा मृत्यू, गगनबावड्यातील घटनेने हळहळ

Kolhapur Newborn Death | कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. दुर्गम बोरबेट (ता. गगनबावडा) येथील गर्भवती महिला कल्पना आनंदा डुकरे (वय ३३) हिला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या. मात्र, प्रतिकूल हवामान, पावसामुळे बंद पडलेले रस्ते आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. अखेर रुग्णवाहिकेतच प्रसुती होऊन नवजात बाळाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री गगनबावड्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर मंगळवारी पहाटे कोल्हापूर–गगनबावडा मार्ग ठिकठिकाणी बंद पडला. अशातच सकाळी कल्पना डुकरे यांना प्रसुती वेदना सुरू झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना गारीवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गाडीतून गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला.

यावेळी मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते. खोकुर्ले परिसरातील पूरग्रस्त रस्ता पार करत असतानाच, पडवळवाडी येथे १०२ रुग्णवाहिकेमध्येच महिलेची प्रसुती झाली. सातव्या महिन्यात अवेळी प्रसुती झाल्याने आणि बालकाची वाढ अपुरी राहिल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

प्रसंगी मोठी धावपळ उडाली होती. खोकुर्ले येथे पाणी साचल्यामुळे 108 रुग्णवाहिकेतील डॉक्टर स्वप्नील तमखाने व चालक सतीश कांबळे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कल्पना डुकरे यांना स्ट्रेचरवरून पुराचे पाणी पार करून सुरक्षित ठिकाणी नेले. पुढे कळे आरोग्य केंद्रातून दुसऱ्या 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

या संपूर्ण घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अतिवृष्टीच्या संकटात नवजात बाळाचा जीव वाचू शकला नसला तरी, आईला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करणारे 108 रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि चालक हे खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरले आहेत.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker