बातम्याहॅलो कोल्हापूर

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूरात आगमन; शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट, उद्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन | Kolhapur High Court circuit Bench

कोल्हापूर | भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज (शनिवार) सायंकाळी ६ वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या (Kolhapur High Court circuit Bench) उद्घाटनासाठी ते येथे आले असून विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर खासदार शाहू महाराज छत्रपती, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विमानतळावरून निघाल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले.

कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा उद्या, रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. भाऊसिंगजी मार्गावरील सीपीआर समोरील ऐतिहासिक इमारतीत हे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे तसेच सर्किट बेंचचे न्यायमूर्ती देखील उपस्थित राहणार आहेत. सोहळा मेरी वेदर मैदानावर पार पडेल.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रारंभ होणार आहे. यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून न्यायदान प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

शाहू महाराजांना अभिवादन करताना सरन्यायाधीश गवई यांनी त्यांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण केले. “सर्वांना समान न्याय” या तत्त्वावर आधारित शाहू महाराजांचे योगदान आजच्या न्यायव्यवस्थेसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker