कोल्हापूर: ऐन दिवाळीत धक्कादायक घटना; बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द दांपत्य ठार

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळेनिनाई येथे आज सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रघूबाई निनो कंक (वय ७०) आणि निनो यशवंत कंक (वय ७५) यांचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोघेही सकाळी शेळीपालनासाठी घराबाहेर गेले असता अचानक बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी गावकऱ्यांच्या घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभाग व पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी अधिकारी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.
रघूबाई यांचा एक हात व पाय नाहीत, तर निनो यांचे मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळले आहेत. दोन शेळ्या गायब आहेत. त्यामुळे हा बिबट्याचाच हल्ला असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाने घटनेची नोंद घेतली असून तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. स्थानिक नागरिकांकडून या भागात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शाहूवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वनविभाग आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे.