बातम्याहॅलो कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभेला वडील बदला घेणार की मुलगा यशाची परंपरा राखणार? | Kolhapur Loksabha Election 2024

कोल्हापूर | कोल्हापूर लोकसभा मतदार संघात (Kolhapur Loksabha Election 2024) महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यांच्याविरूध्द महायुतीकडून कोण? याबाबत मात्र बराच काळ संभ्रमावस्था होती. अखेर विद्यमान खासदार मंडलिक यांनी शिंदेकडे अनेकदा हेलपाटे मारल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिल्ह्यातील सध्याची राजकीय समीकरणे पाहता गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या उलथापालथी झालेल्या आहेत. असे असले तरी शाहू महाराज आणि खा. मंडलिक यांच्यातच लोकसभेची हाय होल्टेज लढत होणार आहे. या लढतीला आता 15 वर्षापूर्वीच्या निवडणूकीचा संदर्भ आहे. यामध्ये वडील बदला घेणार की मुलगा यशाची परंपरा राखणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

15 वर्षापूर्वीच्या निवडणूकीचा संदर्भ काय आहे?

2009 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत विद्यमान खा. संजय मंडलिक यांचे वडिल दिवंगत सदाशिवराव मंडलिक आणि छ. शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे एकमेकांविरूध्द रणांगणात उतरले होते. त्यावेळी अपक्ष असुनही सदाशिवराव मंडलिक यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. ती निवडणूक मंडलिक विरूध्द संभाजीराजे अशी असली तरी खरी लढत मंडलिक विरूध्द शरद पवार अशीच गाजली होती.

2009 साली शरद पवार यांनी म्हातारा बैल म्हणून सदाशिवराव मंडलिक यांच्यावर टीका केली होती. परिणामी राज्यात या लढतीची चर्चा झाली होती. विशेष म्हणजे आता त्याच सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक आणि संभाजीराजे यांचे वडिल शाहू महाराज एकमेकांविरूध्द मैदानात उतरले आहेत. त्यामुळे वडिल शाहू महाराज हे आपले पुत्र संभाजीराजे यांच्या 2009 च्या लोकसभा निवडणूकीतील पराभवाचा बदला घेणार की संजय मंडलिक हे आपले वडिल सदाशिवराव मंडलिक यांच्या यशाची परंपरा कायम राखणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शाहू महाराज यांचे संपूर्ण कुटुंबिय प्रचारात

उमेदवारी जाहीर झाल्यापासून शाहू महाराज यांचे संपूर्ण कुटुंबिय प्रचारात उतरले आहे. यामध्ये माजी राज्यसभा खा. संभाजीराजे, माजी आ. मालोजीराजे यांच्यासह स्नुषा संयोगिताराजे व मधुरीमाराजे आदींचा समावेश आहे. स्वतः शाहू महाराज दररोज किमान 8 ते 10 गावांचा दौरा करून भेटीगाठींवर भर देत आहेत. काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांच्यासह इतर आमदार त्यांच्या साथीला आहेत. तर त्यांच्या विरोधात खा. मंडलिकसुध्दा प्रचारात उतरले आहेत. त्यांच्यासोबतीला पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे खा. धनंजय महाडीक आदीसह भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट खा. मंडलिक यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

कोल्हापूरकर कुणाला निवडून आणायचं यापेक्षा कुणाला पाडायचं यासाठीच मतदान करतात

देशात आणि राज्यात कुणाचीही लाट असली तरी कोल्हापूर त्याला अपवाद असते. कोल्हापूरकर मतदार कुणाला निवडून आणायचं यापेक्षा कुणाला पाडायचं यासाठीच मतदान करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असते. शाहू महाराज पहिल्यांदाच लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. जनतेबरोबरच विरोधी उमेदवारांतही त्यांच्याविषयी आदर आहे. परिणामी टीकेला नक्कीच मर्यादा येणार आहेत. परंतू विरोधकांकडून उमेदवारांऐवजी महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशी लढत असल्याचा मुद्दा प्रचारात आणला जात आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे स्पष्ट आहे. त्यासाठी राज्य आणि देशपातळीवर नेतेमंडळींच्या मुलूखमैदानी तोफाही कोल्हापूरात बरसणार आहेत.

बदललेल्या राजकीय समीकरणाचा कुणाला फायदा? 

2019 मधील लोकसभा निवडणूकीत संजय मंडलिक व धनंजय महाडीक एकमेकांविरूध्द लढले होते. त्यावेळी मंडलिक हे शिवसेना तर महाडीक राष्ट्रवादीचे उमेदवार होते. महाडीक यांचे कट्टर विरोधक आ. सतेज पाटील व आ. हसन मुश्रीफ यांची मंडलिक यांना साथ होती. त्यामुळे तत्कालीन विद्यमान खा. महाडीक यांचा मंडलिक यांनी तब्बल पावणेतीन लाख मतांनी नामुष्किजनक पराभव केला होता. परंतू आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. सतेज पाटील महाविकास आघाडीत आहेत. तर खा. मंडलिक महायुतीचे उमेदवार आहेत. साहजिकच गेल्यावेळी निवडूण आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेल्या खा. मंडलिक यांच्या पराभवासाठी सतेज पाटील रात्रंदिवस फिरत आहेत. तर गत निवडणूकीत ज्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला त्यांचाच प्रचार करण्याची नामुष्की भाजपचे खा. महाडीक यांच्यावर आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर त्यांच्या जोडीला असतील. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणाचा कुणाला फायदा होणार? हे निवडणूकीनंतरच स्पष्ट होईल.

गेल्या तीन लोकसभा निवडणूकीतील मतदान…

2009 :
सदाशिवराव मंडलिक – 428082
संभाजीराजे – 383282

2014 :
धनंजय महाडीक – 607665
संजय मंडलिक – 574406

2019 :
संजय मंडलिक – 749085
धनंजय महाडीक – 474517

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker