मंडलिकांकडून पराभूत झालेले महाडीक आता मंडलिकांचाच प्रचार करणार..! Kolhapur Loksabha Election 2024
Kolhapur Loksabha Election 2024: राजकारणात कोणीच कोणाचा पूर्ण वेळ शत्रू किंवा पूर्ण वेळ मित्र नसतो हे अनेकदा पहायला मिळतं. आपल्या महाराष्ट्रात तर २०१९ नंतर नेत्यांच्या राजकीय भूमिकांच्या कोलांटउड्या पाहणं हे जनतेच्या मनोरंजनाचं साधनच झालं आहे. युती म्हणून एकत्र लढलेले भाजपा-शिवसेना राज्यातील सत्तावाटपाच्या समीकरणात एकमेकांच्या विरोधात अडीच वर्ष संघर्ष करताना दिसले. तर अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील अनेकांचे हिंदुत्व जागं झाल्यानं त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत शिवसेनेचे थेट दोन तुकडे करून टाकले.
जी गत शिवसेनेच्या बाबतीत झाली तीच गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत वर्षभरापूर्वी झालेली पहायला मिळाली. या घडामोडीनंतर शिवसेनेचा उध्दव ठाकरे गट हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत इंडीया आघाडीत सामील झाला. तर शिवसेनेचा शिंदे गट व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाला.
राज्यासह देशातील अशा प्रकारच्या राजकीय उलथापालथींमुळं कोल्हापूर सारख्या मतदारसंघात मात्र अनेक इच्छुकांची गोची झाली, त्यामुळं तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणत या इच्छूकांना गप्प बसावं लागल. तर ज्यांच्याकडून मागील लोकसभेला पराभवाची धूळ चाटावी लागली त्यांचाच प्रचार करण्याची वेळ नेत्यांसह कार्यकर्त्यांवर आली. राज्यसभेचे विद्यमान खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना मागील लोकसभेला प्रा. संजय मंडलिक यांच्याकडून मोठ्या फरकानं पराभव पत्करावा लागला होता. मात्र सध्याच्या राजकीय घ़डामोडींमुळे त्याच मंडलिकांचा प्रचार करण्याची वेळ खा. धनंजय महाडीक यांच्यावर आली आहे.
राजकीयदृष्ट्या कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचं झालं, तर राजर्षी शाहूंच्या पुरोगामी विचारांचा पगडा जपलेला मतदारसंघ असं विश्लेषण करावं लागतं. १९५२ मध्ये पहिल्यांदा इथं काँग्रेसचे देशभक्त रत्नाप्पा कुंभार निवडून आले. त्यानंतर १९५७ ते १९६२ मध्ये कोल्हापूरचे लोकसभेत नेतृत्व शेकापच्या भाऊसाहेब महागावकर आणि १९७७ ते १९८० मध्ये दाजीबा देसाई यांनी केलं. हा अपवाद वगळता १९८० ते १९९८ पर्यंत दिवंगत उदयसिंहराव गायकवाड हे काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर या मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते.
पुढं राज्यात आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकाटावर दिवंगत सदाशिवराव मंडलिक निवडून आले. सदाशिवराव मंडलिकांनी १९९८ ते २००९ या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्त्व केलं. पुढं शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्यानंतर सदाशिव मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडले. राष्ट्रवादीतून ज्या पध्दतीनं मंडलिक बाहेर पडले त्यामुळं मिळालेल्या प्रचंड सहानुभुतीनं २००९ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि एकहाती जिंकून दाखवली. शरद पवारांनी २००९ ला राष्ट्रवादीकडून मंडलिंकाच्या विरोधात संभाजीराजेंना रिंगणात उतरवलं होत. मात्र संभाजीराजेंना यावेळी पराभव पत्करावा लागला होता.
सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं २०१४ मध्ये धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. सन २०१९ पर्यंत शिवसेना आणि भाजप सारख्या उजव्या विचारधारेच्या पक्षांना लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यश मिळालं नव्हतं. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत प्रा. संजय मंडलिक यांनी २०१४ च्या लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढताना धनंजय महाडीक यांना २,७४,५६८ मताधिक्यानं पराभूत केलं. मंडलिकांच्या विजयानं कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या विजयाचा श्रीगणेशा झाला. या निवडणूकीत प्रा. संजय मंडलिकांना ७,४९,०८५ तर धनंजय महाडीकांना ४,७४,५१७ इतकं मताधिक्य मिळालं होतं.
कोल्हापूरात सध्या तीन राजकीय गट फार प्रभावी आहेत. मंडलिक गट, महाडीक गट आणि तिसरा बंटी उर्फ सतेज पाटील गट. यापैकी गत लोकसभा निवडणूकीत मंडलिक गट व बंटी पाटील गट एकत्र होते. त्याचा फायदा मंडलिकांना झाला, आणि ते निवडून आले. मात्र या निवडणूकीत राजर्षी शाहूंचे वंशज शाहू महाराज यांना काँग्रेसचे लोकसभा निवडणूकीचे तिकीट आणण्यात बंटी पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून तिकीट देण्यात आल्यानंतर स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या संभाजीराजेंना मात्र यामुळं वडिलांच्या प्रचारासाठी सक्रिय व्हावं लागलयं.
दुसरीकडं शिवसेना पक्षात फूट पडल्यानं विद्यमान खासदार असलेल्या मंडलिक यांच्या अडचणीत वाढ झालीय. त्यातच कोल्हापूर लोकसभा मतदार संघात मंडलिक यांची निष्क्रिय खासदार अशी प्रतिमा तयार झालीय, त्याचाही फटका मंडलिक गटाला बसणार असल्याची चर्चा कोल्हापूरात सुरू आहे. मागील काही काळापासून कोल्हापूरात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचं काम सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केलं आहे. तर महाडीक गट गोकूळ मधील सत्ता गमावल्यापासून राजकीयदृष्ट्या पिछाडीवर आहे. याचाही फायदा शाहू महाराज यांना लोकसभेला होणार असल्याची चर्चा कोल्हापूरात सुरू आहे.
धनंजय महाडीक सध्या भाजप मध्ये असले तरी त्यांच्या मतदारसंघातील जनसंपर्कामध्ये सातत्य दिसून येत नाही. शिवाय गत निवडणूकीतील पराभवाचं शल्य उरी लपवून त्यांना ज्यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं त्यांचाच प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळं राजकारणात कोणीच कोणाचा फार काळ शत्रू किंवा फार काळ मित्र नसतो हेच या निमित्तानं पहायला मिळत आहे.

