कोल्हापुरात नशेली Mephentermine Sulphate इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघांना अटक; १.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त | Kolhapur Crime News

कोल्हापूर | स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने बुधवारी (२५ सप्टेंबर) शाहूपुरी परिसरात सापळा रचून दोन इसमांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून Mephentermine Sulphate या नशिल्या इंजेक्शनच्या तब्बल ७५ बाटल्या, वापरलेली दुचाकी आणि मोबाईल फोन मिळून सुमारे १ लाख ७४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शाहूपुरीतील निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेल रस्त्यावर एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा मोपेडवरून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तात्काळ छापा टाकण्याचे आदेश दिले.
पोलीस पथकाने २५ सप्टेंबर २०२५ रोजी सापळा रचला. काही वेळाने एमएच-०९-डीसी-३२७७ क्रमांकाच्या अॅक्टिव्हा मोपेडवरून तेजस उदयकुमार महाजन (वय ३५, रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर) हा तिथे आला. थोड्याच वेळात दुसरा एक व्यक्ती विवेक शिवाजी पाटील (वय ३०, रा. माळीवाडी, उचगाव, ता. करवीर) हा त्याच्याजवळ आला आणि त्याने एक बॉक्स तेजस महाजनला दिला. तेजसने तो बॉक्स गाडीच्या डिक्कीत ठेवताच पोलिसांनी दोघांनाही रंगेहाथ पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजस महाजन याचा महादेव मंदिर, कदमवाडी येथे ‘महाजन मेडिकल’ नावाचे दुकान आहे. त्यांच्याकडील बॉक्समध्ये Mephentermine Sulphate इंजेक्शनच्या ७५ बाटल्या, गुन्ह्यासाठी वापरलेली मोपेड आणि मोबाईल असा एकूण १ लाख ७४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
या दोन्ही आरोपींनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे या नशिल्या इंजेक्शनची विक्री केली. याप्रकरणी त्यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, राजू कोरे, प्रदीप पाटील, विलास किरोळकर, शुभम संकपाळ, लखन पाटील, संतोष बरगे, विशाल खराडे, गजानन गुरव आणि सुशील पाटील यांचा सहभाग होता.