कोल्हापूर महापालिकेत कचरा प्रक्रियेत लाखोंचा घोळ; कचऱ्यांतूनही पैसे खाणारी यंत्रणा कार्यरत | Kolhapur Municipal Corporation
कोल्हापूर | कोल्हापूर महानगरपालिकेत (Kolhapur Municipal Corporation) कचरा कोंडाळ्यातूनही पैसे खाणारी यंत्रणा कार्यरत झाली आहे. कचरा प्रक्रियेच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी रिकामी केली जात असताना प्रत्यक्षात मात्र कचऱ्यावर प्रक्रियाच केली जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे महापालिकेच्या कचरा प्रक्रियेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, प्रत्यक्षात प्रक्रिया न करता कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप होत आहे. दैनिक पुढारीने याबाबत वृत्त दिले आहे.
लाखोंचा खर्च, प्रक्रिया शून्य
कोल्हापूर महानगरपालिकेने कसबा बावडा येथे 53 टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा खतनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत हा प्रकल्प अपेक्षेप्रमाणे कार्यान्वित होत नसल्याचे दिसून आले. कचऱ्यातील प्लास्टिक वेगळे काढून संकलन करणे आवश्यक आहे, परंतु या संकलित प्लास्टिकचा ठावठिकाणा लागत नसल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
लिचेड प्रक्रिया प्रकल्पाच्या नावाखाली 85 लाखांचे बिल
लिचेड प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित असल्याचे भासवून एका ठेकेदार कंपनीने महापालिकेकडे 85 लाख रुपयांचे बिल सादर केले होते. त्यातील 65 लाख रुपये आधीच अदा करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत लिचेड संकलनच आढळून आले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात प्रक्रिया झालीच नसताना एवढा मोठा खर्च कसा केला गेला, याबाबत संशय व्यक्त होत आहे.
महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणा सक्रिय?
महापालिकेत कचरा प्रक्रियेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचे दिसत असून, यात महापालिकेतील काही अधिकारी व ठेकेदार यांची साखळी कार्यरत असल्याची चर्चा आहे. खतनिर्मिती प्रकल्पातून केवळ चार टन खत निर्माण होत असल्याचा अहवाल समोर आला आहे, ज्यामुळे 53 टन क्षमतेच्या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नियंत्रण यंत्रणा अपयशी
कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली महापालिकेत ‘खा की खा’ सुरू असल्याचे आरोप होत आहेत. जेसीबी मशिनरीच्या भाड्यासाठी लाखो रुपये खर्च केला जात आहे, परंतु त्याचा प्रत्यक्ष उपयोग होत आहे की नाही, याकडे कोणतेही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे कचरा प्रक्रियेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार सुरू असून, तिजोरीला मोठे भगदाड पाडल्याचे स्पष्ट होत आहे.


