Hello Kolhapur

“अंबाबाईच्या शिखरावर झळकला २.५ कोटींचा सोन्याचा कळस!” | Kolhapur News Ambabai Temple

₹2.5 Crore Golden Kalash Installed on Ambabai Temple’s Main Spire

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांहून अधिक मूल्याचा सोन्याचा कळस (Kolhapur News Ambabai Temple) बसवण्यात आला असून, त्यामुळे मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली आहे. गेल्याच महिन्यात माजी मुख्यमंत्री Narayan Rane अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत मंदिराच्या मुख्य शिखरासाठी सोन्याचा कळस अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. समितीनेही या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर राणे यांनी तातडीने कळस तयार करून तो अंबाबाई मंदिराला अर्पण केला.

शुक्रवारी पहाटे अंबाबाईच्या वाराचे औचित्य साधून हा सोन्याचा कळस मंदिराच्या मुख्य शिखरावर स्थापित करण्यात आला. पहाटे साधारण तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान क्रेनच्या सहाय्याने हा कळस शिखरावर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. शिखराभोवती असलेल्या प्रकाशव्यवस्थेमुळे नवीन कळस पहाटेपासूनच लखलखताना दिसत होता. सकाळी पाच वाजल्यापासून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या स्थानिक तसेच परगावच्या भाविकांना या नव्या कळसाचे दर्शन घेता आले. मंदिराच्या शिखरावर आता हा सोन्याचा कळस कायमस्वरूपी विराजमान राहणार आहे.

या कळसासाठी सुमारे दीड किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. कळसाची उंची सहा फूट असून त्याचा डेरा साडेसात फूट आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या कळसाची किंमत २ कोटी ५० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. कळस बसवण्यापूर्वी गुरुवारी रात्री गणपती चौकावरील शिखराचा मूळ कळस तात्पुरता काढून त्याजागी नव्या कळसाची ट्रायल घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पहाटे अंतिम स्थापनेची प्रक्रिया पार पडली.

विशेष म्हणजे, अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावरील मूळ कळस सुमारे वीस वर्षांपूर्वी काही कारणांमुळे काढण्यात आला होता. त्यानंतर तांब्यापासून तयार केलेला आणि त्यावर सोन्याचा पत्रा लावलेला कळस बसवण्यात आला होता. गेली दोन दशके हा कळस ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत मंदिराची शोभा वाढवत होता. आता त्याच्या जागी नवीन सोन्याचा कळस बसवण्यात आला असून, पूर्वीचा कळस देवस्थान समितीच्या खजिन्यात सुरक्षित जतन करून ठेवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

हा भव्य कळस मेंगलोरमधील एका अनुभवी सराफ कारागिराने तयार केला आहे. अंबाबाई मंदिरावरील मूळ कळसाच्या मापानुसार सुमारे २०० किलो तांब्याचा वापर करून कळसाची रचना करण्यात आली. त्यानंतर त्यावर दीड किलो सोन्याचा पत्रा चढवण्यात आला. हा संपूर्ण कळस तयार करण्यासाठी कारागिराला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लागला. पारंपरिक शैली आणि मूळ कळसाच्या रचनेशी सुसंगत राहील याची विशेष काळजी घेत ही निर्मिती करण्यात आली.

दरम्यान, अंबाबाई मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शुभ मुहूर्त निश्चित करून मंदिराच्या शिखरावर बसवलेल्या या सोन्याच्या कळसाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. या नव्या सोन्याच्या कळसामुळे अंबाबाई मंदिराचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून भाविकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा