बातम्याहॅलो कोल्हापूर

पंचगंगा 35 फूटांवर, अतिवृष्टीमुळे अनेक प्रमुख मार्ग बंद, जिल्ह्यातील वाहतूक विस्कळीत; धरणातून विसर्ग वाढला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Kolhapur Rain Update

कोल्हापूर | जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस (Kolhapur Rain Update) सुरू आहे. घाट, डोंगरदऱ्यांमध्ये दरडी कोसळत आहेत, रस्ते पाण्याखाली गेले आहेत आणि वाहतूक ठप्प झाली आहे. धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आज सकाळी अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने हा घाट मार्ग बंद करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुपारपर्यंत मार्ग सुरळीत होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. बाजारभोगांव–पोहाळे रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता बंद ठेवावा लागला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर येथील हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक थांबली असून संकेश्वरमार्गे पर्यायी मार्ग वापरण्याची व्यवस्था केली आहे. कोल्हापूर–गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील मांडूकली येथे रस्त्यावर पाणी साचल्याने तो मार्गही बंद करण्यात आला आहे. दस्तुरी चौक, कळे येथे बॅरिकेट्स लावून गगनबावड्याकडे जाणारी वाहने परत पाठवली जात आहेत. याशिवाय कोल्हापूर–राजापूर हा राज्य मार्ग बाजारभोगाव येथे पाणी आल्याने बंद झाला आहे.

दरम्यान, धरणांमधूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे. कुंभी धरणातून सकाळी नऊ वाजल्यानंतर वक्रद्वारातून २६१० क्युसेक तर विद्युतगृहातून ३०० क्युसेक असा एकूण २९१० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. राधानगरी धरणातील सर्व सात स्वयंचलित द्वारे उघडली असून त्यातून १०,००० क्युसेक आणि बीओटी पॉवर हाऊसमधून १५०० क्युसेक असा मिळून ११,५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून काल रात्री आठ वाजल्यापासून १७,००० क्युसेक आणि विद्युतगृहातून १६३० क्युसेक असा एकूण १८,६३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढल्यामुळे उद्या सकाळी सात वाजल्यापासून १४,००० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. विद्युत निर्मिती केंद्रातून सुरू असलेल्या १५०० क्युसेक विसर्गासह मिळून एकूण १५,५०० क्युसेक पाणी नदीपात्रात जाणार आहे.

राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळीही वाढली असून आज सकाळी नऊ वाजता ती ३५ फूट ०४ इंच (५४०.९६ मीटर) इतकी नोंदली गेली. विसर्गाचा वेग ३७,०६६ क्युसेक इतका आहे. नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट असल्याने अद्याप धोका टळलेला असला तरी पाणी झपाट्याने वाढत आहे.

या सगळ्या परिस्थितीमुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांनी नदीपात्रात न उतरता जनावरे आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी विनंती करण्यात आली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणांतून विसर्ग वाढवावा लागू शकतो, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.

दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. नद्यांची पाणी पातळी व धरणांचा विसर्ग याबाबत नागरिकांना वेळेत माहिती देण्याचे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सध्या जिल्ह्यात सातपेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने बंदोबस्त ठेवला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker