पुण्यानंतर आता कोल्हापूर हादरलं! बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी | Kolhapur Rape Case
कोल्हापूर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आता कोल्हापुरातही असाच एक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीतील विश्वजीत सचिन जाधव याने बंदुकीचा धाक दाखवत एका तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. आरोपीने शरीरसंबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
घटनेचा तपशील – पीडित तरुणी आणि आरोपी पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. तिने दिलेल्या जबाबानुसार, २०१८ पासून आरोपीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. आरोपीने तिला वारंवार धमक्या दिल्या आणि शरीरसंबंधांचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. तसेच, दोन वेळा तिच्यावर इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
पोलिसांची कारवाई – शाहूपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी आरोपीच्या घरासह शक्य तितक्या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली असून लवकरच त्याला अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट – या घटनेनंतर कोल्हापुरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पीडितेला तातडीने न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
नालासोपारा: बापाचाच मुलींवर बलात्कार, नराधम बाप अटकेत
नालासोपारा | नालासोपाऱ्यात एका नराधमानं आपल्या तीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. आरोपी ५६ वर्षीय पिता कुख्यात गुन्हेगार असून त्याचा खंडणी, गोळीबार आणि हत्येसारख्या गुन्ह्यांचा इतिहास आहे. पोलिसांनी कोकणातील कणकवली येथून आरोपीला अटक केली आहे. तक्रारीनुसार, तो २०१८ पासून सतत आपल्या मुलींवर अत्याचार करत होता. त्याने एका मुलीचा चार वेळा गर्भपातही केला होता.
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपीचा ड्रोनद्वारे शोध सुरू
पुणे | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. या नराधमाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरू केला आहे. तो ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पुण्यात अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे सकाळी आपल्या गावी पोहोचला आणि दुपारपर्यंत आपल्या घरीच थांबला. पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.


