NewsHello Kolhapur

ZP बांधकाम विभागात खळबळ;”14 लाखांची बिले काढली, पण वर्क ऑर्डरच निघाली बनावट… कोल्हापुरात खळबळ!” | Kolhapur Zilla Parishad

Fake Signatures and Bogus Work Orders Trigger Major ZP Construction Department Scam Probe

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात बनावट सह्या आणि बोगस वर्क ऑर्डरच्या माध्यमातून सुमारे साडेतेवीस लाख रुपयांची विकासकामे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे झालेल्या या प्रकारामुळे जिल्हा परिषद (Kolhapur Zilla Parishad) प्रशासनात खळबळ उडाली असून, दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या वापरून कामे मंजूर झाल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता एस. व्ही. सांगावकर तसेच विद्यमान कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील यांच्या बनावट सह्या करून विविध विकासकामांच्या वर्क ऑर्डर्स तयार करण्यात आल्या. सन २०२४ आणि २०२५ मध्ये झालेल्या सुशिक्षित बेरोजगार काम वाटप सभेतून नवे पारगाव येथील अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधकाम, शाळा इमारतींची देखभाल-दुरुस्ती व रंगकाम, समाजमंदिर दुरुस्ती, बौद्ध समाज मंदिरातील पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती, केंद्रशाळेत शौचालय बांधणे तसेच पिण्याच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभालीसाठी संरक्षक भिंत उभारणे अशा विविध कामांचा समावेश होता.

या सर्व कामांची एकूण किंमत सुमारे साडेतेवीस लाख रुपये होती. ही कामे भुदरगड तालुक्यातील तीन आणि शिरोळ तालुक्यातील तीन सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांना मंजूर करण्यात आली होती. मात्र, संबंधित वर्क ऑर्डर्सवर सूरज बाळासो कांबळे यांचे नाव असल्याचे दिसून आले. या वर्क ऑर्डर्सच्या आधारे प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्यात आली आणि काही कामे पूर्णही झाली. विशेष म्हणजे या कामांपैकी सुमारे १४ लाख रुपयांची बिलेही अदा करण्यात आली होती.

दरम्यान, संबंधित कामांच्या मंजुरीबाबत संशय निर्माण झाल्यानंतर नवे पारगाव ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाकडे अधिकृत माहिती मागवली. संबंधित तारखेला झालेल्या सुशिक्षित बेरोजगार काम वाटप सभेत ही कामे नेमकी कोणाला मंजूर करण्यात आली होती, याची चौकशी करण्यात आली. या माहितीची पडताळणी करताना वर्क ऑर्डर्समधील विसंगती समोर आली आणि अखेर हा बनावटपणा उघडकीस आला.

या प्रकरणातील महत्त्वाचा धागा म्हणजे वर्क ऑर्डर्समध्ये वापरण्यात आलेला फॉन्ट. ग्रामपंचायतीकडे सादर करण्यात आलेल्या पत्रांमधील फॉन्ट वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत शंका निर्माण झाली. त्यानंतर अधिक तपास केल्यावर संबंधित वर्क ऑर्डर्स आणि अधिकाऱ्यांच्या सह्या बनावट असल्याचा संशय बळावला आणि अखेरीस तो खरा ठरला.

या घटनेमुळे आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून कामे मंजूर झाल्याचा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून, याप्रकरणी विभाग कोणती कारवाई करतो याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही कागल तालुक्यात एका ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची बनावट सही करून कागदपत्रे जिल्हा परिषदेत सादर केल्याचा प्रकार घडला होता.

सध्या बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालाचे अवलोकन करण्यात आले असून सूरज कांबळे यांना संबंधित वर्क ऑर्डर्सच्या साक्षांकित फेरप्रती सादर करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. त्यांचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत ग्रामपंचायत निर्णय घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा