कोल्हापुरात येण्यासाठी भरावा लागणार ‘एंट्री टॅक्स’? महासभेत होणार निर्णय | Kolhapur KMC
Kolhapur may impose entry tax on out-of-district vehicles to boost municipal revenue.

कोल्हापूर : करवीरनगरीत दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असून त्याचबरोबर बाहेरील जिल्हे आणि राज्यांमधून येणाऱ्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत प्रवेश करणाऱ्या वाहनांवर ‘प्रवेश कर’ अर्थात युजर फी आकारण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आला आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूर जिल्हा पासिंग असलेल्या ‘एमएच-०९’ (Kolhapur KMC) वाहनांना या करातून पूर्णपणे वगळण्याचा विचार करण्यात आला असून इतर सर्व जिल्हे आणि राज्यांतील वाहनांवर हा कर लागू करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भातील ठराव महानगरपालिकेकडे दाखल करण्यात आला असून १७ जून रोजी होणाऱ्या महासभेत त्यावर चर्चा होणार आहे. महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास प्रशासनाकडून सविस्तर आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या परजिल्ह्यातील आणि परराज्यातील वाहनांकडून प्रवेश कर वसूल करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १२७ ‘अ’ आणि ‘इ’ अंतर्गत महानगरपालिकेला आपल्या हद्दीत येणाऱ्या वाहनांवर युजर फी किंवा प्रवेश कर आकारण्याचा अधिकार आहे. याच कायदेशीर तरतुदींचा आधार घेत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्रस्तावानुसार, पुणे, मुंबई, सांगली, सातारा तसेच कर्नाटक आणि इतर राज्यांमधून येणाऱ्या खासगी व व्यावसायिक वाहनांना हा कर लागू होणार आहे. या कराची रचना, वसुलीची पद्धत, प्रवेश बिंदूंवर नाके उभारणे किंवा फास्टॅगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे, तसेच यामधून अपेक्षित उत्पन्न किती मिळू शकते याचा सविस्तर अभ्यास प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाच्या मर्यादा लक्षात घेता शहरातील रस्ते, पार्किंग, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अतिरिक्त निधीची गरज सातत्याने भासत असते. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांवर मालमत्ता कर, पाणीपट्टी किंवा इतर करांचा अतिरिक्त भार टाकण्याऐवजी बाहेरून येणाऱ्या वाहनांकडून निधी उभारणे अधिक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.
नगरसेवकांच्या मते, कोल्हापुरात दररोज हजारो वाहने प्रवेश करतात. या वाहनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. रस्त्यांची झीज वाढते, प्रदूषणात भर पडते आणि पार्किंग व्यवस्थेवरही दबाव निर्माण होतो. त्यामुळे शहराच्या सुविधा वापरणाऱ्या बाहेरील वाहनांकडून युजर फी घेणे अन्यायकारक नसल्याचे मत मांडण्यात आले आहे.
कोल्हापूर हे धार्मिक, ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक, व्यापारी, पर्यटक तसेच कोकण, गोवा आणि कर्नाटकाकडे जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर शहरातून प्रवास करतात. विशेषतः शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या दुप्पट किंवा तिप्पट होते. त्यामुळे प्रवेश कर लागू झाल्यास महानगरपालिकेच्या तिजोरीत दरमहा कोट्यवधी रुपयांची भर पडू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या माध्यमातून मिळणारा निधी शहरातील रस्ते विकास, वाहतूक सुधारणा, पार्किंग सुविधा, प्रदूषण नियंत्रण आणि इतर नागरी सुविधांसाठी वापरता येईल. त्यामुळे स्थानिक करदात्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा न टाकता महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा हा नवा मार्ग ठरू शकतो. आता १७ जून रोजी होणाऱ्या महासभेतील चर्चेनंतर या प्रस्तावाचे भवितव्य निश्चित होणार असून शहरवासीयांचे लक्ष त्या निर्णयाकडे लागले आहे.

